इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

कृषि विभागाची पुनर्रचना करण्याचा विचार : विखे-पाटील


          कोल्हापूर दि. २२ :  बदलत्या परिस्थितीत राज्यातील कृषि क्षेत्र आणि विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्याच्या कृषि विभागात काही बदल करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कृषि विभागाची पुनर्रचना करण्याचा राज्य शासन विचार करीत आहे, अशी माहिती कृषि आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.
      महाराष्ट्र राज्य कृषि पर्यवेक्षक संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कृषि राज्यमंत्री गुलाबराव देवकर,गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषि आयुक्त प्रभाकर देशमुख, महाराष्ट्र राज्य कृषि पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस विजय तपाडकर, अतुल जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
      श्री. विखे-पाटील म्हणाले, कृषि विभागाची व्याप्ती वाढत आणि बदलत चालली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे कृषि विभागात काही बदल अपेक्षित आहेत. हे बदल काय असायला हवेत याचा अभ्यास सुरु आहे. कृषि पर्यवेक्षकाची कृषि विकासात अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यांच्यावर कृषि विकासाचा दर वाढवण्याची जबाबदारी असून त्यासाठी पर्यवेक्षकांनी प्रयत्न करायला हवेत, असे सांगून कृषीमंत्री म्हणाले, राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, याचा विचार प्राधान्याने करावा. विद्यापीठात होणार्‍या संशोधनाचा आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यत कितपत पोहोचवू शकतो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
      गैरकृषी विषयक कामे लावली जाऊ नये, अशा कृषी पर्यवेक्षकांच्या मागणीचा उल्लेख करुन कृषी मंत्री म्हणाले, गैरकृषी काम फक्त कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनाच लादली जातात, अशी तक्रार आहे. याबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करुन सर्व जिल्हाधिकार्‍यांना तशा आशयाच्या सूचना दिल्या जातील. यासाठी प्रयत्न करु. कृषी विभागात ५८७ पदांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. ही भरती पारदर्शी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत
    कृषि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले , कृषि  विभागाकडून शेतकर्‍यांना मोठया अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यात पर्यवेक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. चांगल काम करणार्‍या अधिकार्‍यांचा गौरव करणं आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न केला जाईल. कृषी पर्यवेक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शेतीसाठीचा राज्याचा मास्टर प्लॅन बनवता येऊ शकेल का यादृष्टीने विचार व्हावा असे सांगितले.बदलते हवामान आणि वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात आपल्यासमोर अन्न सुरक्षेचे आव्हान उभे टाकणार आहे. याबाबींचा कृषी पर्यवेक्षक आणि सर्व संबंधितांनी विचार करायला हवा.
      यावेळी कृषि आयुक्त प्रभाकर देशमुख, अतुल जाधव, संजय पाटील. विजय तपाडकर यांची भाषणे झाली. स्वाती शिंदे-पवार यांनी सूत्रसंचलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.