कोल्हापूर दि. १० : नद्या जोड प्रकल्प राबविला तर देश लवकरच प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, त्याचबरोबर देश महासत्ता होण्यासाठी कृषी क्रांती झाली पाहिजे असे प्रतिपादन त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.
जयपूरची राष्ट्रीय कृषी पणन संस्था व हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तळसंदे येथील महाविद्यालयात शेतकरी कृषी विपणन जनजागरण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात मार्गदर्शन करतांना पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील बोलत होते.
देशात गेल्या अनेक वर्षापासून शेतीचे प्रयोग सुरु आहेत. शेतकर्यांनी या संशोधनाच्या माध्यमातून आपल्या पीक पध्दतीत बदल करायला हवा असे सांगून डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, कृषी पदवीधरांनी उद्योग-व्यवसायांबरोबरच कृषी क्षेत्रात अनेकविध प्रयत्नातून विविध पिकांचे उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये तळसंदे येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या स्थापनेमागील उद्देश विषद करुन अडचणी विषद केल्या.
शेतकरी कृषि विपणन जनजागरण कार्यक्रमात प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्गाचे डॉ. जे. पी. पाटील यांनी ऊस पिकाचे काढणी पश्चात व्यवस्थापन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉ. बी. एस. जाधव यांनी ऊस पिकाचे उत्पादन व विपणन एक दृष्टीक्षेप या विषयावर तर कोल्हापुरच्या कॉमर्स कॉलेजचे प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी ऊस पिकाच्या विपणन व मूल्यवर्धन समस्या या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच जयपूरच्या राष्ट्रीय कृषी पणन संस्थेचे महासंचालक डॉ. आर. पी. मीना, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. टी. ए. मोरे यांचीही समयोचित भाषणे झाली.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य बी. पी. पाटील यांनी शेतकरी कृषी विपणन जनजागरण कार्यक्रमाचा आढावा घेतला.
यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, कर्नल शंकरराव निकम, आनंदराव पाटील चुयेकर, डॉ. एम. वाय. पाटील, डॉ. साबळे, तळसंदेच्या सरपंच राजाक्का लोहार, हौसेराव पाटील तसेच शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम. एम. नरके यांनी केले तर डॉ. हेमा यादव यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.