इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

गतीमान प्रशासनासाठी शासन कटिबध्द - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण


कोल्हापूर दि. २१ : गतीमान प्रशासन ही काळाजी गरज आहे. सामान्य माणसाला केंद्गबिंदू मानून तत्त्पर,  सुलभ व पारदर्शी प्रशासनाचा लाभ देण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून शासन प्रयत्नशिल आहे.गतीमान प्रशासन देण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये माहिती  तंत्रज्ञानाचा पर्याप्त वापर करण्यात येत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी संबंध महाराष्ट्रातील भूमी पुनर्मोजणी करण्याचा सुमारे ५ हजार कोटींपेक्षाही अधिक गुंतवणुकीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून यामध्ये उपग्रहाद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याने सातबारा वरील नोंदीमध्ये अचूकता येईल असे सांगितले.
आमदार सा. रे. पाटील यांच्या प्रयत्नातून शिरोळ येथे सुमारे ६ कोटी रुपये खर्चाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील होते. तर वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील,              आमदार सा.रे.पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी, उपाध्यक्ष धैर्यशील माने, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष सदाशिव पोपळकर, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
      सामान्य माणसाला स्वच्छ, पारदर्शी व गतीमान प्रशासन देण्यासाठी शासनाने शासकीय कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता, कार्यपद्धतीचे सुलभीकरण, ई-गव्हर्नन्स आदी मुद्यांवर लक्ष केंद्गीत केले आहे, असे सांगून ना. चव्हाण यांनी नाविण्यपूर्ण योजना राबविणार्‍या अधिकार्‍यांना प्रोत्साहनही देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जातवार जनगणना कार्यक्रमात सर्व जनतेने संपूर्ण सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या सुरु असलेल्या योजनांचे पुनर्विलोकन करुन त्यामध्ये सुधारण करण्याची गरज व्यक्त करुन जुन्या आणि नवीन योजनांच्या अंमलबजावणीच्या सनियंत्रण व्यवस्थेमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले.
      राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा  राज्यातील सुमारे १० कोटी जनतेला लाभ मिळणार असल्याचे सांगून ना. चव्हाण यांनी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेखाली १ लाख रुपयांपर्यन्त पीक कर्जाची व्याजासह मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना आता कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही असा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगितले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानामुळे लोकांना विविध प्रकारचे दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण झालेले आणि बंद झालेले पाणंद रस्ते, शेत रस्ते मोकळे होतील. त्याचप्रमाणे जनतेला मंडल पातळीवर एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी समाधान योजना महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विकासाच्या उपक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा सातत्याने आघाडी घेत असल्याचे सांगितले. त्यानी आमदार. सा. रे. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करुन जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या विविध विकास कामांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी त्यांनी मिशन गोल्ड योजना, नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारी महिला भवन योजना, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आलेली स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक केंद्ग, आय. ए. एस.च्या ट्रेनिंगसाठी कोल्हापूर येथे उभारण्यात आलेली इमारत, बाबूराव पेंटर स्मृती अकादमीसाठी शासनाने मंजूर केलेले १५ कोटींचा निधी आदीबाबत माहिती दिली.
डॉ. पतंगराव कदम यांनी आमदार सा. रे. पाटील यांचे सहकार चळवळीला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले. महसूल मंत्री श्री. थोरात यांनी शिरोळ येथे होणार्‍या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे  सामान्य माणसाला पारदर्शी, सुलभ आणि तत्पर सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी राजस्व अभियानांतर्गत राज्यात फेरफार आदालतींचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याने यापुढे सातबारा अद्ययावत राहतील असे सांगितले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास शासन प्राधान्य  देईल असे सांगितले.
यावेळी शिरोळ तहसिल कार्यालयाला मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच राजस्व अभियानांतर्गत विविध योजनांच्या धनादेशाचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन                श्री. तुषार ठोंबरे यांनी केले तर आभार तहसिलदार डॉ. संपत खिलारे यांनी मानले. कार्यक्रमास विविध संस्थाचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.