सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार -- पालकमंत्री हर्षवर्धन पाटील


कोल्हापूर दि. १ : पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असून ठोस उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन, सर्व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराबाई सभागृहात आज पटसंख्या पडताळणी मोहीम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, सुवर्ण जयंती राजस्व अभियान, स्वच्छता महोत्सव, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती आराखडा विमोचन आदिंचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
      पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी घनकचरा, फौंड्री वेस्ट, सांडपाणी, साखर कारखाने तसेच इतर उद्योजकांनी सांडपाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील पहिली ते बारावी पर्यंतची पटसंख्या तपासणी कार्यक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील ४३ गावे निर्मल ग्राम करुन संपूर्ण कोल्हापूर जिल्हा निर्मल गाव होण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर निर्मल झालेली गावे निर्मल राहतील याचीही काळजी घ्यावी. शाहू जन्मस्थळ विकासास अनुदान दिले असून याबरोबरच यासारखे चित्रनगरी, शाहू मिल  प्रश्नही मार्गी लावण्यात येतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
      महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे जून २०१२ अखेर शंभर कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असल्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात पाच हजार हेक्टर जमिनीखाली फळबागांची लागवड केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वीची अपूर्ण असलेली २१४८ कामे प्राधान्याने सुरु केली जातील. जिल्ह्यात एकूण दोन हजार पाणंद रस्ते आणि पाच हजार विहिरींची कामेही या योजनेतून सुरु केली जाणार आहेत.
      महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविले जात असून सर्वसामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल. नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांना विविध दाखले १० वी उत्तीर्ण होण्यापूर्वीच मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेषतः जातीचे दाखले जिल्हा प्रशासन व शैक्षणिक संस्था यांच्या समन्वयातून विभागवार शिबीरांचे आयोजन करुन घरपोच देण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. राजस्व अभियानामुळे विविध दाखले देण्यामध्ये सहजता, अचुकता व पारदर्शकता येत असल्याचे नमूद करुन फेरफार अदालतीच्या माध्यमातून १ महिन्याच्या आत नोंदी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३ गावे निर्मल करण्यासाठी तहसलिदार आणि गटविकास अधिकार्‍यांनी विशेष प्रयत्न करावेत असे सांगून गृह व ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक गावाने जास्तीत उद्दीष्ट साध्य करावे. तसेच राजस्व अभियान प्रभावीपणे राबवून नागरिकांना दाखल्याबाबत कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
      कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या 'सेव्ह द बेबी गर्ल'या उपक्रमास टाईम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट अ‍ॅर्वार्ड जाहीर झाल्याबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
      बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी, महापौर वंदना बुचडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धैर्यशील माने, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, तहसिलदार, गटविकास अधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.