कोल्हापूर दि. ११ : कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा सन २०१२-१३ चा वार्षिक आराखडा २०० कोटी रुपयांचा असावा असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या स्मॉल कमिटीच्या बैठकीत आज करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार सा.रे. उर्फ अप्पासाहेब पाटील, समितीचे नागरी भागातील सदस्य अशोक आरगे, ग्रामीण भागातील सदस्य शिवानंद माळी, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
सन २०१२-१३ साठीच्या जिल्हा वार्षिक आराखड्यासाठी १५८.११ कोटी रुपयांची जास्तीत जास्त मर्यादा आहे. पण त्यामध्ये ६६ कोटी ८९ कोटी रुपयांची वाढ करुन २२५ कोटी रुपयांची प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे. तरी किमान २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव असावा, असा ठराव करण्यात आला.
विशेष घटक योजनेसाठी फेरप्रस्ताव द्यावेत. सुधारित प्रस्ताव येत्या शनिवारपर्यंत जिल्हा विशेष समाज कल्याण अधिकारी बाजीराव पाटील यांच्याकडे सादर करावेत, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.