शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११

चर्मोद्योग प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविले

           कोल्हापूर दि. ७ : संत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील कुटुंबातील पात्र मुला-मुलींना व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण योजना राबविण्यात येते.
प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी पुढील अटी पूर्ण करीत असलेल्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात  येत  आहेत.  अटी  पुढीलप्रमाणे  - संस्थेस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई, व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळ, मुंबई यांच्याकडून मान्यता अथवा इतर तत्सम संस्थांशी संलग्नता असावी. संस्था मागील सलग पाच वर्षापासून कार्यरत असावी, सस्थेचे मागील तीन वर्षाचे ऑडिट पूर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, यंत्रसामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. संस्थेकडून मागील तीन वर्षात ट्रेडनिहाय किती प्रशिक्षणार्थींनी वर्षनिहाय प्रशिक्षण दिले आहे याचा तपशील देण्यात यावा. मागील तीन वर्षात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किती प्रशिक्षणार्थींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, नोकरी मिळाली आहे याचा तपशील देण्यात यावा. संस्थेस शासन मान्यतेप्रमाणे एका वर्षात ट्रेडनिहाय किती विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी मान्यता असल्याबाबतचा सविस्तर तपशील देण्यात यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सदर ट्रेडची परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल याचा तपशील द्यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉब प्लेसमेंटकरिता काय कार्यवाही करण्यात येते व प्रशिक्षणार्थीस स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी कोणती मदत करण्यात येते. यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे याचा तपशील द्यावा. बाहेरगावच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकेल काय ? याबाबतचा तपशील देण्यात यावा.
             अटींची पूर्तता करणार्‍या प्रशिक्षण संस्थांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, २९०७, बी, सुभाषनगर, कोल्हापूर-४१६ ०१२ यांच्याकडे दि. २० ऑक्टोबर २०११ अखेर प्रस्ताव सादर करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.