मंगळवार, १ जून, २०२१

शहर व ग्रामीण भागात अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांची कोविड तपासणी होणार -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 




 

      कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील कोरोनाचा वाढलेला रुग्णदर  कमी होण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहर व ग्रामीण भागामध्ये अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे घोळक्याने गप्पा मारत बसणे, जेवणाचे कार्यक्रम करणे, भाजीपाला तसेच किराणा घेण्यासाठी गर्दी करणे यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी पोलीस व संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडून याबाबत निर्बंध आणून या पथकासोबत कोविड तपासणी पथकही दिले जाईल व अशा व्यक्तींची जाग्यावरच अँटीजन टेस्ट  करण्यात येईल.

        जिल्हा बंदी अजूनही असल्यामुळे जिल्हा प्रवेशासाठी नागरिकांनी पास घेवूनच जिल्ह्यात प्रवेश करणे अपेक्षित आहे. परराज्यातील व्यक्तींच्या प्रवेशासाठी यापूर्वी शासनाने लागू केलेले आदेश (निर्बंध) लागू राहतील. संबंधिताकडे पासची तपासणी तसेच आवश्यकतेप्रमाणे त्याचे थर्मल स्कॅनिंग, पल्स ऑक्सीमीटर तपासणी केली जाईल. त्याचबरोबर संशयित व्यक्ती आढळल्यास संबंधिताची अँटीजेन टेस्ट केली जाईल. तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरते वाहन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

          जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अधिक असून यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व नागरिकांनी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, घर अपुरे असल्यास घरातील एका बाधित व्यक्तीकडून कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर द्या.  फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेंतर्गत कार्यरत दुकानदार व कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर यांची अँटिजेन तपासणी करुन घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या विक्रीस बंदी घाला. नेमून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरु असल्यास अशी दुकाने बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

          महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत रस्त्यांवर अनावश्यक कारणाने फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी करुन घ्या. रुग्णसंख्या अधिक प्रमाणात असणाऱ्या शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील रुग्णदर  कमी होण्यासाठी सरपंच व ग्राम स्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करायला हवेत. तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांच्या बैठका घ्याव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी गाव निहाय व प्रभाग निहाय सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. यासाठी रुग्ण संख्या जास्त असलेल्या गावटूल सर्व सरपंच व ग्रामसमिती सदस्यांची दुरदृश्य प्रणाली द्वारे बैठक घेऊन सूचना देण्यात येणार आहेत व पुढील 15 दिवसात गाव कोरोना मुक्त करणारी ग्रामसमिती व सरपंचाचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

          आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांचा धोका लक्षात घेऊन  लहान बालकांसाठी सोयी सुविधा निर्माण करायला हव्यात. हेल्पलाईनद्वारे नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती तात्काळ मिळवून द्यावी. तसेच व्हेंटिलेटरयुक्त बेड वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या लवकरात- लवकर कमी होण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असेही आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

          आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोविड सेंटरमधील रुग्णांच्या तब्बेतीच्या चढउतारावर लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिक देखील किरकोळ कारणासाठी बाहेर पडल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. फिरत्या पथकांमार्फत शहर व गावांमध्ये अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी करुन घ्यायला हवी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास जिल्ह्याचा रुग्णदर कमी होईल, असा विश्वास यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.

          या बैठकीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.