मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

माविमच्या वतीने पूरग्रस्त महिलांसाठी ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

 

 

कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या  जिल्हा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत जिल्ह्यातील 7 तालुक्यातील एकूण 108 ग्रामीण व 10 शहरी भागात बचत गटामार्फत महिला सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. माहे जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे माविम कार्यरत असलेल्या 70 गावात महापुर आला होता. या महापूरामुळे महिलांचे घर, शेती, जनावरांचे नुकसान झाले. काही महिलांची घरे अतिवृष्टीमुळे पडली, तर अनेकांचे संसारिक साहित्य वाहून गेले. या महिलांना आधार देण्यासाठी माविम कोल्हापूर स्थापित लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून एक हात मदतीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

    माविम स्थापित 6 लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून पूरग्रस्त महिलांना मदत करण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. यात विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू घेण्यात आल्या. गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, डाळी, साबण, चहा पावडर, आटा अशा स्तूंचे एकत्रित किट तयार करण्यात आले. काही ठिकाणी पूरग्रस्तांना जेवण देण्यात आले. रिलायन्स फौंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मास्कचे वाटप करून मास्क वापरण्याच्या फायद्यांविषयी  माहिती दिली. पूरग्रस्त महिलांपैकी नुकसानग्रस्त 3 हजार 100 पूरग्रस्त महिलांना एक हात मदतीचा अंतर्गत मदत देण्यात आली .

मदत मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना महिला म्हणाल्या की, खरोखर माविम मार्फत स्थापित सीएमआरसी मधील बचत गटातील महिलांनी आपल्याच महिलांकरिता दिलेली मदत ही कौतुकास्पद आहे. एक हात मदतीचा हा उपक्रम अभिनव असून याचा महिलांना नक्कीच फायदा झाला आहे. आपल्याच बचत गटांतील महिलांनी आपल्याच बचत गटांतील महिलांना केलेली मदत पाहून महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. याअभिनव उपक्रमात माविम कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी /कर्मचारी, मदतनीस, सी एम आर सी मधील कार्यकारिणी मंडळ, कर्मचारी व बचत गटांतील महिलांचे सहकार्य लाभले .

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.