कोल्हापूर,
दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): लसीकरणात
कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे. त्याच धर्तीवर कोरोना मुक्तीबाबत
कोल्हापूर जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार
घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्ह्यातील
सर्व प्रभाग समिती, ग्राम समिती अध्यक्ष, प्रभाग व ग्राम समित्यांचे सर्व सदस्य,
सचिव, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी
सभागृहात आज जिल्हाधिकाऱ्यांनी वेबीनारव्दारे संवाद साधला.
जिल्हाधिकारी पुढे
म्हणाले, जिल्ह्यातील 60 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रथम प्राधान्य
देण्यात येणार असून याकरिता सुमारे 19 हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. 60 वर्षावरील
एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाकडून दक्षता घेण्यात
येईल. जिल्ह्यात 60 वर्षापुढील सुमारे 54 टक्के नागरिकांचे मृत्यू हे लसीकरणाअभावी
झाले असून ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाला न घाबरता लस घ्यावी. प्रशासनातर्फे
प्रत्येक गावात, मनपा क्षेत्रात ‘महा ई सर्व्हे’ सुरू करण्यात आला असून याचे
सकारात्मक परिणाम दिसत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली दिसत
असली तरी नागरिकांनी घाबरू नये. कोरोना रूग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्याला प्रशासनाने
प्राधान्य दिले असून याकामी जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फुर्त साथ द्यावी.
कोरोनाने एकही मृत्यू होवू नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे, अशी
सूचना करून, प्रशासनाने दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने चालू ठेवणाऱ्या
दुकानदारांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
ग्रामपंचायतीने सादर
केलेल्या आराखड्यातील एकूण रक्कमेपैकी 25 टक्के रक्कम ही संबंधित ग्रामपंचायतीला
कोव्हिडच्या अनुषंगाने खर्च करता येईल. आशा वर्करना एक हजार रूपये प्रोत्साहन
भत्ता देण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागात मोकाट
फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल. कारवाईच्या अनुषंगाने प्रशासनाकडे
नऊ वाहने दाखल झाली असून ही वाहने जिल्ह्यात सर्वत्र फिरून कारवाई करणार असल्याची
माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
तत्पूर्वी कोरोनाला
गावाच्या वेशीवर थोपविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध
उपायांची माहिती माणगावचे राजू मगदुम, वडणगेचे सचिन चौगुले, कवठेसादच्या श्रीमती
दिपाली भोकरे आणि बेळगुंदीचे सरपंच तानाजी रानगे यांनी सांगितली. त्यांच्या या
उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी
संजयसिंह चव्हाण यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
या बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार,
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
उषादेवी कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह
दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्ह्यातील विविध भागातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित
होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.