सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

जिल्ह्यात 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविणार - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 



कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कोल्हापूर): पोलिओ लसीकरण ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोविड -19 च्या मार्गदर्शक सुचनांनुसार सॅनिटाईझर, मास्क व ग्लोव्हजचा  वापर, आरोग्य कर्मचारी व लाभार्थी / नातेवाईकांमध्ये योग्य ते अंतर (सामाजिक अंतर - Social Distancing) या त्रिसूत्रीनुसार मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना 17 जानेवारी रोजी पोलिओचा डोस देण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीच्या सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी  डॉ. अशोक पोळ,   निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. हर्षला वेदक, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. फारूक देसाई  आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषयक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 17 जानेवारी 2021 रोजी राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत 0 ते 5 वयोगटातील अंदाजीत 3 लाख 20 हजार लाभार्थ्यांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.

आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी या मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात शेवटचा पोलिओ रुग्ण 23 ऑगस्ट 1999 मध्ये शाहूवाडी तालुक्यात करंजोशी या गावी आढळला होता त्यानंतर जिल्ह्यात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. 2021 मध्ये ही मोहीम एकदाच होणार असल्यामुळे 100 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण  शहरी मिळून 2015 लसीकरण केंद्राची तसेच, 669 मोबाईल टीम, 314 ट्रान्झीट टीमची स्थापना करण्यात आलेली आहे.

 17 जानेवारीनंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस घरभेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी 2451 आयपीपीआय टीमच्या घरभेटीद्वारे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व बालकांना पोलिओ लस दिलेल्याची खात्री करण्यात येणार आहे व वंचित लाभार्थ्यांना तात्काळ पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.

000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.