सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

जिल्ह्यात लसीकरण मोहीम; प्रभावीपणे अंमलबजावणी करा लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई

 



 कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करा.लसीकरणाच्याप्रशिक्षणाबाबत सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

          जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृती दल  समितीची  सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी गोवा डॉ. खैरनारे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, सी.पी.आर.च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, उप महिला व बाल कल्याणचे मुख्यकार्यकारी अधिकरी सोमनाथ रसाळ आदीजण उपस्थित होते.

           काही  महिन्यात  कोव्हिड  प्रतिबंधात्मक  लस  उपलब्ध  होण्याची शक्यता  आहे.  लसीकरण  कार्यक्रमापेक्षा  पूर्णत:  वेगळे  आहे    पहिल्यांदाच  ही  लस  उपलब्ध  होणार  आहे.  त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.  कोल्ड  चेन    पुरवठा चेन  बाबत योग्य  नियोजन  करा.  लसीकरणाबाबत जनजागृती  करा. शासनाच्या  मार्गदर्शक  सूचनांबाबत ग्रामपातळीवरील यंत्रणांना अवगत करा, असेही ते म्हणाले. 

            यावेळी बोलतांना डॉ. साळे म्हणाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मागदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.  कोव्हीड लसीकरण कार्यक्रम मोठा आणि सर्वांसाठीच राहणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे कोटेकोरपणे पालन व्हावे. लसीकरणाबाबत शासनाकडून  प्राप्त  होणाऱ्या सूचना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात जास्त कालावधी राहण्याची  शक्यता  कमी  आहे.  यंत्रणांनी आतापासूनच सुक्ष्म नियोजन करून तयारी ठेवावी.

          सर्व प्रकारचे खासगी नोंदणीकृत डॉक्टर, रुग्णालय, डिस्पेन्सरी, यांनी त्यांच्याकडे कार्यरत वैद्यकीय कर्मचारी यांची माहिती नजीकच्या शासकीय रुग्णालयात लसीकरणपूर्व नोंदणी करावी. कोव्हिड लसीकरण ऐच्छिक असले तरी लसीकरणासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात लसीकरण होणारे अधिकारी कर्मचारी यांनी नोंदणी करुन घ्यावी. गर्व्हनन्स ॲन्ड कोऑर्डिनेशन मेकॅनीझमव्दारे राज्यस्तरापासून ते तालुकास्तरापर्यत समन्वय साधणेत येणार आहे. सर्व विभागाच्या समन्वयाने लसीकरण मोहीम राबवायची आहे.  लसीकरणाचे राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण 14 व 15 डिसेंबर, जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण 18 व 19 डिसेंबर रोजी  तर तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये   21 ते 26 डिसेंबर  दरम्यान ऑफलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात 9.5 लाख व्यक्तिंना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

            जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई  यांनी पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. यात लसीचे प्रकार, त्याची सद्यस्थिती  कालावधी, लसीकरीता स्टोअरेजबाबत उपलब्धता, कोविंन सॉफ्टवेअर बद्दल अवगत केले 

आदींचा समावेश होता.  बैठकीला विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत रोटरी क्लब, लायन्स क्लब, रेडक्रॉस सोसायटी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.