कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती
कार्यालय): देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूर विरांनी प्राणांची
आहुती दिली आहे. त्यांची परतफेड कोणत्याही स्वरुपात करु शकत नाही. परंतु, सशस्त्र
सेना ध्वजदिन 7 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने निधी संकलनास हातभार
लावून खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी पवार, संयोजक
चंद्रशेखर पांगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन
झाली. स्वागत प्रास्ताविकात श्री.पवार यांनी करुन निधी संकलनाबाबत माहिती दिली ते
म्हणाले, 7 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत हा निधी गोळा केला जातो. या निधीतून शहीद
जवानांच्या कुटुंबियांच्या अडी-अडचणी दूर केल्या जातात. युध्दात किंवा युध्दजन्य
परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून सेवा निवृत्त झालेल्या
जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग
केला जातो. गतवर्षी 1 कोटी 60 लाख 79 हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. कोरोना
संक्रमणामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक स्थितीतही नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त
प्रतिसादामुळे 90 लाखाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
अपर जिल्हाधिकारी श्री. पवार म्हणाले,
युध्दभूमीवर तसेच अतिरेक्यांच्या भ्याड कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी
स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या योध्यांच्या बलिदानाची आपण कोणत्याही स्वरुपात
परतफेड करु शकत नाही. परंतु, त्यांचे
कुटुंबीय, अवलंबितांचे पुनर्वसन करुन अंशत: का होईना परतफेड करु शकतो. गतवर्षी चा
अनुशेष आणि चालू वर्षाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी
मदत करुन पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी श्री. पांगे यांनी सर्वाचे
आभार मानले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.