मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची माहिती

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांचे तसेच  न्यूज चॅनेलचे पत्रकार यांनी कोरोना कालावधीत कोरोना आजाराविषयी प्रभावी व वस्तूस्थिती निहाय बातम्या वृत्तपत्रातून प्रसारीत करून मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या सेवाभावी व सक्षम जाणीवेतून केलेल्या या अभूतपूर्व कार्याबाबत या सर्वांचे विशेष अभिनंदन करून सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, 19 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव क्र. 1407 पारीत करण्यात आला. जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना जिल्ह्यामध्ये रूगणसंख्या वाढत होती. या बाधित रूग्णांना वेळेत उपचार होवून विषाणूचा प्रतिबंध करण्याकरिता शासनस्तरावरून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत होती. त्यानुसार जिल्ह्यामध्येही प्रतिबंध करण्यासाठी व बाधित रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत होत्या.  यावेळी लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात शंका व भीती होती. या शंका व भीतीचे निराकरण योग्य प्रकारे व योग्यवेळी प्रभावी होणे आवश्यक होते. त्यामुळे लोक व वस्तूस्थिती यामधील कोणीतरी दुवा होणे गरजेचे होते. अशा कालावधीमध्ये लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ प्रसारमाध्यमांनी प्रभावी दुवा होण्याचे कर्तव्य व सेवा अशी दुहेरी भूमिका बजावली आहे.

प्रसार माध्यमांनी  वेळोवेळी दिलेल्या बातम्यांमुळे लोकांना या महामारीच्या कालावधीत वस्तूस्थितीची माहिती, जाणीव, दक्षता याबाबत जनजागरण करून लोकांच्या शंका व भीती घालविण्यामध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी केली आहे. याबाबत सभागृहामध्ये चर्चा होवून जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांचे  तसेच  न्यूज चॅनेलच्या पत्रकारांचे विशेष अभिनंदन करून सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.