गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 38 जणांवर कारवाई, 5 हजार 400 दंड वसुली कारवाईसाठी पोलीसांची मदत घ्या- भाऊ गलंडे

 






कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात 38 जणांवर कारवाई करत 5 हजार 400 रूपये दंड वसुली करण्यात आली आहे. तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती, प्रबोधन याबरोबरच दंडात्मक कारवाईही करावी. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची मदत घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी आज दिले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज घेण्यात आली. सुरूवातीला डॉ. प्रल्हाद देवकर यांनी स्वागत केले. प्रभारी जिल्हा सल्लागार चारुशीला कणसे यांनी यावेळी जिल्ह्यातील आढावा दिला. त्या म्हणाल्या, कोटपा कायद्या 2003 च्या अंमलबजावणीकरिता पुढील महिन्यात अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणी धाडी घालण्यात येणार आहेत. तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत शाळेपासून 100 यार्ड परिसरात पिवळ्या रंगाचा पट्टा आखण्यात येणार आहे. थुंकीमुक्त अभियान सद्या राबविण्यात येत आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलंडे म्हणाले, तंबाखूमुक्त  तसेच थुंकीमुक्त मोहिमेसाठी प्रबोधन, जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाईवर भर द्या. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा. यासाठी स्थानिक पोलीसांची मदत घ्यावी.

यावेळी द्या तंबाखू व ई सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार, असे सांगत उपस्थित सर्वानी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेली एकूण दंडवसुली

(एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020)

विभाग           व्यक्तींची संख्या      दंड वसुली

आरोग्य-                 24                2600

पोलीस          -                  13                 2600

अन्न व                  

औषध प्रशासन -      1                    200

 

 

 

 

 

जनजागृती स्पर्धेत प्रियंका लिंगडे राज्यात चौथ्या

महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्य शासनामार्फत तंबाखूमुक्त जनजागृती मोहिमेसाठी पोस्टर्स स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत  तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डाटा ऑपरेटर प्रियंका लिंगडे यांना चौथ्या क्रमांकासाठी स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मिळाले. तसेच श्रीमती कणसे आणि सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनाही सहभाग घेतल्याबद्दल प्रशस्तीपत्र मिळाले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलंडे यांच्या हस्ते प्रदान करून आज तिघींचेही अभिनंदन करण्यात आले.

 

00000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.