इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित

 


 

कोल्हापूर दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय):-  राज्य शासनाने एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्चित केले असून त्यानुसार १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी  ३ हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत.

            कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी एच.आर.सी.टी.चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने राज्यातील विविध खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून हे दर निश्चिती केली आहे. यामध्ये सी.टी.स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्म,पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जी.एस.टी. चा समावेश आहे.

            एच.आर.सी.टी नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे दर लागू राहणार असून शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी जर कोणत्याही रुग्णालय/तपासणी केंद्राचे एच.आर.सी.टी तपासणी दर नवीन दरापेक्षा कमी असल्यास, कमी असलेले दर तपासणीसाठी लागू राहतील.एच.आर.सी.टी तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सी.टी. मशिन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल.

            डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय एच.आर.सी.टी करण्याची मागणी नागरीकांडून करण्यात येते. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जन द्वारे तपासणी असल्याने जोखीम असते यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय ही तपासणी करु नये.  एच.आर.सी.टी तपासणी करणाऱ्या रेडीओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखादया रुग्णालयाने किंवा कार्पोरेट /खाजगी आस्थापनेने जर एच.आर.सी.टी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत,

सर्व रुग्णालये/ तपासणी केंद्र यांनी एच.आर.सी.टी तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिन च्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावणे तसेच, निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पीटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील.  तपासणीसाठी निशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी व जिल्हा स्तरावर (महानगरपालिका क्षेत्र वगळून) संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित महानगरपालिका क्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी राहतील. ही दर आकारणी साथरोग कायदयांची अंमलबजावणी असेपर्यंत चालू राहतील.      

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.