इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडून चांगल्या कामाबद्दल यंत्रणेचे कौतुक ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत घरा घरात सर्वेक्षण करा -पालकमंत्री सतेज पाटील

 




 

       कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत दक्ष राहून घरा घरात जावून सर्वेक्षण करा. सर्वेक्षणातून कोणीही सुटता कामा नये. त्याचबरोबर मास्क नाही तर प्रवेश नाही, हा उपक्रमही घरा घरात पोहचवा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.

       जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री श्री. पाटील यांनी तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. उषादेवी कुंभार उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, इथून पुढे अजूनही दक्ष राहून काम करा. कुणीही सर्वेक्षणातून सुटणार नाही याची काळजी घ्या. एकाद्या गावात रुग्ण सापडल्यास यापूर्वी त्या घराचे सर्वेक्षण झाले होते का ? याबाबत चुक सुधारण्यासाठी आपणच आपले परिक्षण करा. गेले सात महिने सर्व यंत्रणा कोव्हिड-19 च्या उपाय योजनेत कार्यरत आहे. आरोग्य यंत्रणेने इथून पुढे सक्षमपणे काम करण्याबाबत नियोजन करावे. जिल्ह्यामध्ये तुमच्या सर्वांकडून चांगलं काम सुरु आहे. असे सांगून सर्व यंत्रणेचे त्यांनी अभिनंदन केले.

          जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनीही यावेळी सर्व यंत्रणेचे कौतुक करुन अभिनंदन केले. ते म्हणाले, सर्व यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती, लोक शिक्षण चांगल्या पध्दतीने सुरु आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाही याचे फलक लावायला सुरुवात झाली आहे. याची पाहणी काही ठिकाणी भेट देवून केली आहे.  सर्वच नगरपालिका  सक्रीय झाल्या आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी फलक लागले पाहिजेत आणि त्याचे पालनही व्हायला हवे. त्यासाठी कार्यवाही करावी. ग्रामस्थांनी सवय म्हणून मास्क, सामाजिक अंतर अंगिकारले पाहिजे.  ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन होईल ते दुकान दोन दिवस, आठ दिवस बंद करावे आणि त्याची प्रसिध्दी करावी.

          किरकोळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फेरवाले यांच्याकडूनही या उपक्रमाचे पालन व्हायला हवे. त्यासाठी एनएसएस, एनसीसी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, समाज सेवक यांचा सहभाग घ्यावा. ज्या ठिकाणी सत्काराचे, अभिष्टचिंतनाचे फलक लागतात त्या ठिकाणी या मोहिमेचे फलक लावा. मृत्यूदर 1 टक्याच्यावर जाता कामा नये. याबाबत नियोजन करावे, असे म्हणाले.       

0 0  0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.