कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : तरुण
मंडळे, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागातून ‘माझे कुटुंब माझी
जबाबदारी’ प्रभावीपण राबवा. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे याचीही कडक
अंमलबजावणी करावी. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट
विकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण
रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, पोलीस अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद
साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी
अमन मित्तल, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
नो
मास्क नो इंट्री ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. उल्लंघन करणाऱ्या विरुध्द पोलीस
अधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने कारवाई करावी. वारंवार नियमभंग
होत असल्यास सक्तीने दुकाने बंद करावीत, अशी सूचना सुरुवातीला देवून जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी तालुका निहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, ‘माझे कुटुंब
माझी जबाबदारी’ या मोहिमेतून लवकर शोध, लवकर तपासणी आणि लवकर उपचार पध्दतीचा अवलंब
करावा. प्रभावीपणे सर्व्हेक्षणाचे काम करावे. प्रतिबंध क्षेत्रात स्थानिक
लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या सहकार्यातून कोणतीही हालचाल होणार
नाही याबाबत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. इली, सारीचे रुग्ण शोधण्यावर अधिक
भर द्यावा. त्यासाठी स्थानिक खासगी डॉक्टर्स, औषध दुकानदार यांचीही मदत घ्यावी.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्ती जास्त भर द्यावा.
रेस्टॉरंट,
खानावळी मध्ये रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सुविधा लागू करण्यात आली आहे. परंतु
अजुनही काही ठिकाणी या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीस
अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर कारवाई करावी. केलेल्या
कारवाईचा अहवाल पाठवावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
महापालिका
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला लोक चळवळ
बनविण्यासाठी लोकांचा मोठा सहभाग वाढवावा. या मोहिमेदरम्यान आरोग्य शिक्षण देणे
महत्वाचे आहे. पूर्व कोव्हिड, कोव्हिड झाल्यानंतर आणि कोव्हिड मुक्तीनंतर काय
काळजी घ्यायला पाहिजे याबाबत संदेश दिला गेला पाहिजे त्यावर भर द्या. लोकांना
नियमांचे वळन लावायचे आहे. जाणीव जागृती, लोक प्रबोधन यावर भर देण्यासाठी सर्वांनी
मिळून प्रयत्न करुया.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.