बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा - तहसिलदार शीतल मुळे-भामरे

 








 

कोल्हापूर दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :- माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम करवीर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधीनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधी आपल्या गावात मोहिमेची प्रचार-प्रसिद्धी करुन गावकऱ्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी केले.

            आरोग्य पथकामार्फत उजळाईवाडी येथे  ग्रामस्थांची तपासणी केली जात असताना तहसिलदार श्रीमती मुळे-भामरे यांनी उजळाईवाडी येथे भेट देऊन आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीत सहभाग घेतला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत असून यामध्ये कोरोना, इली व सारीच्या संशयित रुग्णांबरोबरच अन्य आजार असलेल्या रुग्णांची  माहितीही संकलित केली जात आहे. करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 244 आरोग्य पथके गठित करण्यात आली  आहे. या पथकामार्फत तालुक्यातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. एका आरोग्य पथकामध्ये आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि अरोग्य सेवक  या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य पथकामध्ये  शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून  कांही ठिकाणी स्वयं सेवकही मदत करत असल्याचे तहलिदार श्रीमती मुळे-भामरे यांनी सांगितले. आरोग्य पथकामार्फत घरोघरी जावून सर्व्हेक्षणाचे काम सुरु असून यामध्ये ताप, खोकला, इली व सारीच्या संशयित रुग्णांची माहिती संकलित करुन ती ग्रामपंचायतीकडे जमा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.