इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

खुल्या स्वरुपातील मिठाईसाठी बेस्ट बिफोर तारीख दुकानात लावणे बंधनकारक

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय) : स्थानिक बाजारातील मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या प्रत्येक मिठाईसाठी वापरण्यायोग्य कालावधी  (बेस्ट बिफोर तारीख) दुकानाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी कळविले आहे.

          सहायक आयुक्त श्री. शिंगाडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, स्थानिक बाजारातील मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या खाण्या-पिण्याच्या अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणण्यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे.

       आत्तापर्यंत केवळ पॅकबंद अन्न पदार्थाच्या पाकिटावरील लेबल वर्णनामध्ये या पदार्थाची उत्पादन तिथी आणि वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर तारीख) छापणे बंधनकारक होते. तथापि अलीकडच्या कालावधीमध्ये मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या मिठाईमुळे अन्न विषबाधा होत असल्याची प्रकरणे निदर्शनास येत असल्याने खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या मिठाईवर बेस्ट बिफोर तारीख असणे बंधनकारक केले आहे.

          या नियमाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व मिठाई दुकानदारांनी यापुढे त्यांच्या दुकानामध्ये मिळणारी मिठाई वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर तारीख) दर्शविणारा फलक दर्शनी भागामध्ये लावावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.