गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या वाड्या-वस्त्या व गावांची तालुकानिहाय यादी सादर करा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 


 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणारी गावे व वाड्या-वस्त्यांच्या नावांची तालुकानिहाय यादी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाला सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

          जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रशांत खेडेकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. आजगेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते, तर तहसीलदार व गट विकास अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले.

टंचाई परिस्थिती उदभवणाऱ्या वाड्या-वस्त्यांची नावे प्राप्त झाल्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेतून या भागांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या. बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत नवीन प्रस्तावित 54 योजनांना मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.