रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली वापरून २०२५ पर्यंत जिल्हा क्षयरोग मुक्त करूया -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

 



कोल्हापूर, दि 17 . (जिमाका): उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे  टी.बी. होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली (टी.पी.टी.) दिल्यास भविष्यात  टी.बी. होणार नाही. क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली वापरून २०२५ पर्यंत  कोल्हापूर जिल्हा क्षयरोग मुक्त करूया, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, शेंडा पार्क येथे आयोजित क्षयरोग प्रतिबंधात्मक  उपचार प्रणाली (टी.पी.टी.) प्रशिक्षणाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यशाळेस एकूण ९१ शासकीय वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, सध्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष आहे. दर दिवशी १ हजार क्षयरुग्ण देशात सापडतात. सध्या टी.बी. झालेल्या रुग्णांवर शासनातर्फे नियमित उपचार सुरु आहेत. टी.बी.चा उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंध करणे बरे आहे.यामध्ये ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे असे टार्गेट ग्रुप जसे टी.बी. 'पॉझिटिव्ह' रुग्णाच्या घरातील संपर्कातील रुग्ण, एच.आय.व्ही. 'पॉझिटिव्ह'  रुग्ण,  आणि डायलेसीस रुग्ण, कॅन्सर रुग्ण, ऑर्गन बदललेले रुग्ण, किडनीच्या आजाराचे रुग्ण असे  प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना टी.बी. होण्याचा धोका जास्त आहे. अशा वेळीं या रुग्णांना Tuberculosis Preventive Treatment (TPT) क्षयरोग प्रतिबंधक उपचारप्रणाली दिल्यास पुढील संभाव्य धोका टळेल. हा टार्गेटेड ग्रुप ६ हजार ५०० च्या वर आहे. सध्या लोक शाळा, ऑफिस, व्यवसायानिमित्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे क्षयरोग तसाच कोविड-१९ चा धोकाही वाढतो आहे. सध्या शासनातर्फे आरोग्य विभागाकडे विशेष निधी दिला जातो. त्याचा परिपूर्ण वापर त्यांनी करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

श्री. चव्हाण यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे केंद्रीय स्तरावरील सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.या प्रणालीसाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. हा वाढविण्यासाठी सर्वांनी जास्तीत-जास्त प्रयत्न करावेत. सर्वांनी या प्रणालीचे सर्व वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी हे प्रशिक्षण घेऊन आपल्या अंतर्गत असणाऱ्या कर्मचारी यांचे प्रबोधन करावे व २०२५ पर्यंत  जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा. कुंभार म्हणाल्या, ज्यांना सक्रिय पॉझिटिव्ह क्षयरोग नाही पण क्षयरोगाचे जंतू शरीरात आहेत त्यास Latent tuberculosis infection (LTBI)  (सुप्त क्षयरोग संसर्ग) असे म्हणतात. यामध्ये त्यांचा  छातीचा एक्स-रे, थुंकी मायक्रोस्कोपी तपासणी निगेटीव्ह असते. जगातील अंदाजे 1/3 लोकसंख्येला सुप्त क्षयरोगाचा संसर्ग आहे. टीबी संसर्गाचा सर्वाधिक भार भारतावर आहे. क्षयरोग प्रतिबंधक उपचारप्रणाली मध्ये टीबी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीच्या  सुप्त क्षयरोग संसर्ग (एल.टी.बी.आय.) असलेल्या व्यक्तीमधून पॉझिटिव्ह टी.बी. शोधून त्यास उपचारप्रणाली सुरु करणे व निगेटिव्ह असल्यास पुढे सक्रिय टीबी होऊ नये म्हणून विविध टेस्ट करून जसे  इग्रा (IGRA) पॉझिटिव्ह आहे, पण एक्स रे निगेटिव्ह आल्यास क्षयरोग प्रतिबंधात्मक  उपचार प्रणाली (टी.पी.टी.) देतात. आरोग्य कर्मचाऱ्यांव्दारे फुफ्फुसीय पॉझिटिव्ह टीबी रुगांच्या  गृहभेटी दरम्यान पॉझिटिव्ह टीबीच्या व्यक्तीच्या संपर्कातील घरातील कॉन्टक्टमधील सर्व लहान मुलांना  तसेच  एच.आय.व्ही  पॉझिटिव्ह पेंशटना  टीबी प्रतिबंधक उपचार  (टी.पी.टी.)  दिला जाईल.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी कदम, वैद्यकीय अधिकारी (डी.टी.सी) यांनी केले. आभार डॉ. विनायक भोई यांनी मांडले. यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, एच.एफ.डब्लू.टी.सी.च्या प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक, डॉ. रुपाली भाट, डॉ. भोई व जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी सर्व एन.टी. ई.पी.स्टाफ उपस्थित होते.

 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.