गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

पाणंद व वहिवाटीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अर्ज करावेत


 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): वहिवाटीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 चे कलम 5 नुसार प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात माहे नोव्हेंबर 2021 मध्ये गाव नकाशावर असणारे पाणंद रस्ते व अस्तित्वात असणारे वहिवाटीचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे.  शेती हा कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. बदलत्या काळात शेती करण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. पारंपरिक शेती पध्दतीमध्ये बैलांकरवी ओढकामाच्या शेतकी औजारांव्दारे शेती कसली जात होती. बदलत्या शेती करण्याच्या पध्दतीत यांत्रिकीकरण, यांत्रिक अवजारे यांचा सर्रास वापर वाढला आहे. शेतात यांत्रिक अवजारे (ट्रॅक्टर, कल्टीव्हेटर, मालवाहू वाहने, ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर व ट्रक) जाण्यासाठी रस्त्यांची नितांत आवश्यकता झाली आहे. इलेक्ट्रीक मोटारव्दारे जलसिंचित क्षेत्रात सिंचन होत असल्याने रात्री अपरात्री शेतात मोटार चालू/बंद करण्यासाठी जाण्याचे प्रसंग येतात. यामुळे अतिक्रमण मुक्त पाणंद व वहिवाटीचे रस्ते असणे महत्वाचे आहे.

 

यासाठी गांव पातळीवर तलाठी यांना अतिक्रमीत रस्ते निदर्शनास आणून द्यावेत. किंबहुना लोकसहभागातून लोक चळवळ म्हणून शिवारातील शेतक-यांनी आपसात विचारविमर्श करून स्वयंप्रेरणेने गाव नकाशाप्रमाणे पाणंद/पांधण रस्ते, गाडी रस्ते, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग खुले करावेत. त्यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती यांची मदत घ्यावी. आवश्यकतेनुसार महसूल प्रशासनाची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.