कोल्हापूर,
दि. 6 (जिमाका) : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या
कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे
शेतकरी उत्पादक गट/संस्था/ कंपनी/स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना
लाभ देय आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारीत असून कोल्हापूर
जिल्ह्याकरिता ऊस उत्पादन निवडण्यात आलेले आहे. योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन,
पुरवठा साखळीशी जोडणी व त्याव्दारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे.
योजना बँक कर्जाशी निगडीत असून
वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के
व कमाल 10 लाख मर्यादेत व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय
आहे. तसेच मार्केटिंग व ब्रँडींगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या
50 टक्के अनुदान देय आहे.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेंतर्गत शेतकरी
उद्योजकांनी https://pmfme.mofpi.gov.in
या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची असून अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी/उपविभागीय कृषी अधिकारी या कार्यालयांशी संपर्क
साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी
या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव
वाकुरे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.