कोल्हापूर दि. 22 (जिल्हा माहिती
कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राची उल्लेखनीय परंपरा लाभली आहे.
जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा राज्य, राष्ट्र
आणि जागतिक पातळीवर उमटविला आहे. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा लौकिक
वाढविण्यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. खेळाडूंना अशा
सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शेंडा पार्क येथे जिल्हा क्रीडा
संकुल उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रस्ताव क्रीडा विभागाने तातडीने
पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा क्रीडा संकुल
समितीच्या बैठकीत दिल्या. जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
झाली. बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, क्रीडा
उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्यासह
जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,
जिल्हा क्रीडा संकुल जागेची मागणी करताना येथील भविष्याचा विचार करुन खेळाडूंच्या
विकासाच्या दृष्टिने जास्तीत जास्त जागेची मागणी करावी. अद्ययावत क्रीडा संकुल
उभारताना पार्किंग, मुलां-मुलींसाठी वसतीगृहे, बहुउद्देशीय हॉल प्रत्येक
खेळासाठी स्वतंत्र हॉल अशा सुविधा असाव्यात. जिल्हा क्रीडा संकुल आवारात
दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. पालकमंत्री श्री. म्हणाले, जिल्हा
क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या क्रीडा
संकुलात, विविध खेळांची दर्जेदार मैदाने व इमारती उभारण्याबाबत
वास्तुविशारदांसाठी स्पर्धा आयोजित करावी. स्पर्धेतून निवडलेल्या आराखड्यानुसार
जिल्हा क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येईल. कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा
संकुलामध्ये ज्या सुविधा नाहीत त्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये करण्यासाठी
प्राधान्य देण्यात येईल. महापालिका क्षेत्रातील सर्व
प्रभागामधील क्रीडांगणासाठी राखीव जागा उपलब्ध आहेत. या जागेवर विविध खेळांची क्रीडांगणे, इमारती
विकसित करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा. यासाठी जिल्हा
नियोजन समितीमार्फत नाविण्यपूर्ण योजनेतून
किंवा क्रीडा विभागाच्या सुविधा निर्मिर्तीच्या योजनांतून निधी उपलब्ध करुन
देण्यास प्राधान्य दिले जाईल. शहरातील खेळाडूंसाठी या ठिकाणी सुविधा निर्माण
झाल्यास कोल्हापूर शहराचा स्पोर्ट्स हब म्हणून नावलौकिक होईल. महापालिकेने आयसोलेशन
हॉस्पिटल येथे जागा उपलब्ध करुन दिल्यास येथे इनडोअर स्टेडियम बांधण्याचा मानस आहे. महापालिकेने जागा
व इनडोअर स्टेडियम उभारणीचा प्रस्ताव द्यावा. राज्य
व केंद्र शासनाकडून प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यास पाठपुरावा केला जाईल.
प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी स्वतंत्र हॉल झाल्यास अशा ठिकाणी राष्ट्रीय
स्पर्धांचे आयोजन करणे सोईचे होईल. याबाबतही महापालिकेने प्रस्ताव सादर करावा. त्यास
आवश्यकती मदत व निधी उपलब्ध करुन दिला जाईल. मिशन
कोल्हापूर गोल्ड पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,
कोल्हापुरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी
क्रीडा विभागामार्फत ‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या
अंतर्गत खेळाडूंसाठी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉण्झ या तीन गटात सुविधा उपलब्ध
करुन दिल्या जाणार आहेत. या गटा व्यतिरिक्त विशेष कौशल्य असणाऱ्या खेळाडूंसाठी
मदत व सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी
सांगितले. क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख
निर्माण करु पाहणाऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध
करुन देण्याचा मानस आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक सुविधा
देण्याबरोरच फिजिओथेरेपीस्ट, स्पोर्ट्स सायकॉलॉजी,
आहरतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनर, सोनाबाथ सिस्टीम, प्रयोगशाळामधीलमधील विविध तपासण्या,
विमा याचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय
पातळीवरील स्पर्धांचे आयोजन झाल्यास जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रास विकास
होण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या नवीन खेळाडूंसाठी प्रेरणा मिळेल. यासाठी
क्रीडा विभागाने सर्व स्पोर्ट्स असोसिएशनची बैठक घ्यावी. राष्ट्रीय पातळीवरील
स्पर्धाच्या नियोजनाबाबत यामध्ये चर्चा करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री.
पाटील यांनी दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. साखरे
यांनी क्रीडा विभागामार्फत खेळाडूंसाठी पुरविण्यात येत असलेल्या सुविधा आणि
जिल्हा क्रीडा संकुलाबाबत माहिती दिली. 000000 |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.