गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

मास्क नाही प्रवेश नाही सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

 



      कोल्हापूर, दि. १७ (जिल्हा माहिती कार्यालय)- व्यापाऱ्यांनी मास्क घातला नसेल तर ग्राहकांनी वस्तू घेवू नयेत आणि ग्राहकांनी मास्क घातला नसेल तर व्यापाऱ्यांनीही वस्तू देवू नयेत. अर्थात "मास्क नाही प्रवेश नाही ! आणि ग्राहकांकडून सामाजिक अंतर राखले जात नसेल तर व्यापाऱ्यांकडून वितरणही नाही", या  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

            जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई यांनी व्यापारी असोशिएशनसोबत आज व्हीडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब  गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते. 

            जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शासनाने सध्या हाती घेतली आहे. जिल्ह्यामध्येही वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कारखानदार, व्यापारी यांनीही दर्शनी भागात मास्क नसेल तर प्रवेश नाही या संदेशाचा फलक लावावा. तसेच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. व्यापाऱ्यांनी मास्क लावला नसेल तर ग्राहकांनीही त्यांच्याकडून वस्तू घेणे टाळावे. तसेच कर्मचाऱ्यांनीही दुकानात, प्रवेश करु नये. खरेदीसाठी येणाऱ्या  ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास, व्यापाऱ्यांनीही त्यांना वितरण करु नये. 

            फेरीवाले, किरकोळ विक्रेते, फळविक्रेते, दूध विक्रेते, मटण विक्रेते या सर्वांनीही या मोहीमेत सहभागी होवून आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले. ते म्हणाले, मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझेशन करणे या साध्या उपायांनी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वजण  रोखू शकतो. वेळीच तपासणी करुन अहवाल आल्यानंतर त्वरित उपचार करता येतील. त्यामुळे संभाव्य धोका टाळता येतो.  सर्व कारखानादार, व्यापारी, किरकोळ विक्रेते संघटनांनी याबाबत प्रबोधन आणि काटेकोर अंमलबजावणी करावी. मास्क घातल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही याची कडक अंमलबजावणी करा.

व्यापारी, उद्योगपती, खासगी आस्थापनांकडून प्रतिसाद

            खासगी व शासकीय कार्यालये, कारखान्यांमध्ये विना मास्क प्रवेश दिला जाणार नाही. सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छताविषयक स्टिकर आस्थापनांकडून मुद्रित केले जातील, ही स्टीकर्स आस्थापनांच्या बाहेरील ठिकाणी प्रदर्शित करु असा प्रतिसाद यावेळी असोशिएशनकडून मिळाला     याचे उल्लंघन झाल्यास दुकाने, कारखाने, कार्यालयांना दंडाची तसेच बंद ठेवण्याची कारवाईही केली जाईल.

            नियम पालनाची ही क्रिया व्यवहार करणार्‍या नागरिकांची आणि आस्थापना या दोघांची आहे. या नियमांचे पालन नागरिकांसह आस्थानांनी करावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची यशस्वी वाटचाल यावर ठरेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

            महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, सर्वांना मास्क घालायला प्रवृत्त करा. मास्कच आपल्याला संसर्गापासून रोखू शकणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कोव्हिड काळजी केंद्रामध्ये फळ, मास्क, हँन्डग्लोज, सॅनिटाझर याचे दानशुरांनी वाटप करावे. घरगुती वापरासाठी ऑक्सीजन जनरेटरही देण्यास हरकत नाही, असे आवाहन त्यांनी केले.

            कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्टे, खजानीस हरीभाई पटेल, कार्यकारी संचालक ललित गांधी, अजित कोठारी, अतुल पाटील, गोविंद माने, रणजित शहा, संदीप वीर, कुलदीप गायकवाड, रघुनाथ कांबळे आदींनी यामध्ये सहभाग घेतला. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ग्वाही या सर्वांनी दिली.

0 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.