मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

शिरोळ तालुक्यासाठी आवश्यक आरोग्य साहित्य उपलब्ध करा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आदेश

 


 


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय):  शिरोळ तालुक्यामधील कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या व आरोग्य प्रशासनावर पडत असलेला ताण यावर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना उभारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूरात सलग दोन दिवस आढावा बैठका घेतल्या. सोमवारी जयसिंगपूर नगरपरिषद येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये शहरातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी पतसंस्था, सेवाभावी संस्था या सर्वांच्या प्रतिनिधींना कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी वस्तूरुपी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

       यावेळी जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार डॉ. खटावकर उपस्थित होते.

        जयसिंगपूर मध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व वरिष्ठ व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. तालुक्यातील सद्यस्थिती बद्दल सविस्तर चर्चा झाल्यानंतर शिरोळ तालुका आरोग्य विभागाच्या मागणीप्रमाणे तालुक्याच्या आरोग्य विभागाला आरोग्य सामग्री घेण्याचे निश्चित करण्यात आले. वाढती रुग्णसंख्या पाहता वैद्यकीय साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे तसेच कुरुंदवाड येथे सुरू असलेल्या 30 बेडच्या कोवीड केअर सेंटरला आवश्यक ते आरोग्य साहित्य पुरवले जावे असेही राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी सांगितले.

             शिरोळ तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी नव्याने चार व्हेंटिलेटर, तीन हायफ्लो नोझल कॅनोला मशीन्स, ऑक्सीजन साठी शंभर जम्बो सिलेंडर्स, फेवीफ्लू'च्या १०,००० गोळ्या यासह सर्व प्रकारचे साहित्य शिरोळ तालुका आरोग्य विभागाच्या मागणीप्रमाणे घेण्याचे आदेश आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले, नव्याने सुरू होणाऱ्या कोवीड सेंटर साठी आवश्यक स्टाफ जिल्हा आरोग्य विभागाकडून पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपल्या स्तरावर लागणारा स्टाफ तात्पुरता भरती करून घ्यावा असेही यावेळी ठरले, वॉर्डबाय पुरवण्याची‌ ग्वाही सांगली मधील एका संस्थेने घेतली. रेमीडेसिबील इंजेक्शनचा शिरोळ तालुक्यासाठी साठा उपलब्ध करून द्यावा अशा सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

 00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.