बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

बाहेरून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची ग्रामसमिती, प्रभागसमिती मार्फत नोंद आवश्यक जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 


कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) : तपासणी नाके बंद करण्यात येत असल्याने जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यामधून तसेच राज्यामधून दाखल होणाऱ्या व्यक्तींची नोंद ग्रामस्तरावर ग्रामसमिती व शहरी भागामध्ये प्रभाग समित्यांमार्फत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोव्हिडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस नजिकच्या कोव्हिड काळजी केंद्रात तपासणी करून घेणे बंधनकारक करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

 श्री. देसाई यांनी याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, नगरपालिका/ नगरपंचायत/ नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व ग्रामसमिती/ प्रभागसमिती यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्याच्या हद्दीवर उभारण्यात आलेले तपासणी नाके आजपासून बंद करण्यात येत आहेत. तथापि प्रवास करून जिल्ह्यामध्ये दाखल होणाऱ्या नागरिकांची नोंद करणे तसेच ग्रामसमिती व प्रभागसमिती जोमाने कार्यरत करून त्यांच्यामार्फत कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना राबवून सामुहिक संसर्गाला आळा घालता येईल. त्यासाठी पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

तपासणी नाके बंद करण्यात येत असल्याने जिल्ह्या व राज्याबाहेरून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची नोंदणी ग्रामस्तरावर ग्रामसमिती व शहरी भागामध्ये प्रभाग समितीमार्फत करून नोंदवहीत नोंदी घेणे.

प्रवास करून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींना कोव्हिड-19 सदृश्य लक्षणे जसे की, ताप, सर्दी, खोकला इ. लक्षणे असल्यास त्या व्यक्तीस नजिकच्या कोव्हिड काळजी केंद्रात जावून तपासणी करून घेणे बंधनकारक करावे. याबाबत स्थानिक समित्यांनी पत्रव्यवहार करणेदेखील हरकतीचे नाही.

त्या व्यक्त्तीचे अहवाल तपासणी अंती निगेटिव्ह आल्यास अशा व्यक्तीस घरी स्वतंत्र व्यवस्था असल्यास ती गृह अलगीकरणात राहील याबाबत ग्रामस्तरीय समितीने/ प्रभागसमितीने दक्षता घ्यावी.

 तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यास अशा व्यक्तीवर कोव्हिड काळजी केंद्रामार्फत उपचार केले जातील. परंतु, संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या (हाय रिस्क)व्यक्तीचे आरोग्य यंत्रणेमार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसींग करण्यात यावे. त्याचे कुटूंबीय व इतर व्यक्ती या थेट सामाजिक संपर्कामध्ये येणार नाहीत याची तपासणी करून दक्षता घ्यावी.

गाव/शहरामध्ये वाहनचालक तसेच वाहतूक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींबाबत प्रकर्षाने तपासणी करणे तसेच त्यांना अलगीकरण करण्याबाबत कार्यवाही करावी.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.