इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, १ जानेवारी, २०१२

वाहतुकीचे नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांचीच -- जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख

       कोल्हापूर दि. १ : वाहतुकीचे नियम आणि रस्ता सुरक्षा नियम पाळणे सर्वांसाठी आवश्यक असून ती सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज केले.
      कोल्हापूर जिल्हा पोलीस दल, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्‌घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, श्री. एस.एस. बच्चे-पाटील, कर्नल शंकरराव निकम याप्रसंगी उपस्थित होते.
      श्री. देशमुख यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर पाळण्याची आवश्यकता आहे. रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचा सर्वांनीच संकल्प करायला हवा. आपल्या देशांतील वाहनांची संख्या वाढत आहे. पण रस्त्यांच्या पायाभूत सुविधेत पुरेशी वाढ होत नाही. त्यामुळे  वाहतुकीचे नियम पाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
      वाहतुकीच्या नियमांचे सर्वांना प्रशिक्षण द्यावे यासाठी एक योजना आखता येईल, त्यास जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.
      कोल्हापूर जिल्ह्यात १ जानेवारी ते १५ जानेवारी २०१२ पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव म्हणाले, देशाच्या पंधरा टक्के अपघात महाराष्ट्रात होतात. नैसर्गिक आपत्तीपेक्षाही अपघातात मृत्यू पावणार्‍या लोकांची संख्या जास्त आहे. अपघातामुळे राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात हानी होते. अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात, त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे.
      प्रारंभी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. डी. सावंत  यांनी मानले. सूत्रसंचलन सीमा मकोटे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.