कोल्हापूर दि. १३ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुक्त व न्याय वातावरणात निवडणुका होण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेत अपायकारक व उपद्गवकारक बाबीवर बंधने घालणे आवश्यक असल्याने राधानगरीचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी रणजित पांडुरंग देसाई यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१२ च्या कालावधीत पुढील आदेश जारी केले आहेत.
कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा पोलीस अधीक्षकांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारची मिरवणूक संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्याच्या किंवा पोलीस अधीक्षकांच्या पूर्व परवानगी शिवाय काढता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस / संस्थेस ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पिकर) वापर पोलीस अधिकार्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. कोणत्याही व्यक्ती, संस्थेस फिरत्या वाहनात ध्वनीक्षेपक (लाऊड स्पिकर) लावता येणार नाही. निवडणूक काळात ध्वनिक्षेपकाचा (लाऊड स्पिकर) वापर संबंधित पोलीस अधिकार्याच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. ध्वनीक्षेपकाचा वापर सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्रौ १० वाजल्यानंतर करता येणार नाही. सार्वजनिक संस्था, इमारती व त्याचा परिसर हा प्रचार कार्यालय, प्रचार सभेसाठी वापरता येणार नाही. मोटार गाड्या, वाहने ही कोणत्याही परिस्थितीत तीन पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात चालविण्यात येऊ नयेत. मात्र सदर आदेश सर्व मोठ्या संरक्षक केंद्ग किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीस घेवून जात असेल तेंव्हा त्यांचे सुरक्षिततेबाबत लागू असलेल्या अनुदेशाच्या अधिन राहून अमलात येईल. तसेच सदर आदेश शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या ताफ्यावर लागू असणार नाही.
निवडणुक जाहीर झालेल्या तारखेपासून निवडणूक संपेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने / उमेदवाराने / त्यांच्या कार्यकर्त्याने / पक्षाचे कार्यकर्त्याने किंवा उमेदवाराविषयी सहानुभूती असणार्या व्यक्तींना किंवा संस्थांना खाजगी अथवा सार्वजनिक ठिकाणी त्या जागेच्या मालकाचे संमतीशिवाय कटाऊट्स, मोठे बोर्डस्, नोटीस चिकटण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी किंवा उमेदवाराच्या चिन्हाची चित्रे रेखाठण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणताही राजकीय पक्ष, संस्था अगर व्यक्ती सर्वसामान्य किंवा विशिष्ट लेखी परवानगी शिवाय कटाऊट्स, मोठे बोर्डस्, भिंत फलक, झेंडे, कापडी बॅनर्स किंवा वर्तमानपत्रात जाहिरात देऊ शकणार नाहीत. असे कटाऊट्स किंवा मोठे बोर्डस् हे महामार्ग, रस्त्याच्या कडेला, रस्ता क्रॉसिंगवर, शासकीय इमारती, इतर मिळकत, विजेचे किंवा टेलिफोनचे खांब यावर संबंधित अधिकार्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष किंवा संस्था किंवा व्यक्ती लावणार नाही. सदरचा आदेश दि. ३ जानेवारी २०१२ ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहील, असेही राधानगरीच्या कार्यकारी दंडाधिकार्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.