कोल्हापूर दि. ५ : विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ च्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हे येतात. या तीनही जिल्ह्यातून अर्जातील त्रुटीपूर्तता, मुलाखती, चौकशीसाठी दररोज समिती कार्यालयात अनेक नागरिक येतात. त्यामुळे गर्दी होऊन नागरिकांना उत्तरे देण्यास अडचणी येत असल्याने जनतेची गैरसोय होते व दैनंदिन कामकाजाची गतीही राखता येत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कामाची अपेक्षित गती राखता यावी यादृष्टीने समितीने कामकाजाचे पुढीलप्रमाणे जिल्हानिहाय नियोजन केले आहे.
जिल्हानिहाय सेवा व शैक्षणिक प्रकरणातील त्रुटीपूर्तता, मुलाखतीसाठी जिल्हानिहाय वार निश्चित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यासाठी सोमवार, सांगली जिल्ह्यासाठी मंगळवार, कोल्हापूर जिल्ह्यासाठी बुधवार तसेच समितीसमोरील सुनावणी प्रकरणांसाठी गुरुवार असे दिवस निश्चित करण्यात आले आहेत.
शैक्षणिक प्रकरणे ही संबंधित महाविद्यालयांमार्फत संबंधित जिल्ह्याच्या विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात विहित मुदतीतच स्वीकारली जातात. सेवाविषयक (नियुक्ती/पदोन्नती) प्रकरणे संबंधित नियुक्ती प्राधिकार्यांकडून सर्व कार्यालयीन कामाचे दिवशी समिती कार्यालयात स्वीकारली जातील. कार्यालयीन कामाचे दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत दूरध्वनीवरुन चौकशी करता येईल.
सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय क्र. बीसीसी२०११/ प्र.क्र.१०६४/ २०११/ १६५-ब दि. १२ डिसेंबर २०११ निर्गमित करण्यात आला असून ज्या उमेदवारांना जाती वैधता प्रमाणपत्राअभावी नियुक्ती आदेश प्राप्त झालेले नाहीत, अशा उमेदवारांनी आपल्या नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव रविंद्ग कदमपाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.