मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

हातकणंगले तहसिल कार्यालयाच्या शंभर मीटर परिक्षेत्रात निर्बंध लागू

         कोल्हापूर दि. १७ : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१२ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने दि. १८ जानेवारी २०१२ ते २३ जानेवारी २०१२ अखेर सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तहसिलदार कक्ष, तहसिदार कार्यालय, हातकणंगले येथे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहेत. तसेच दि. २४ जानेवारी २०१२ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे व दि. ३० जानेवारी २०१२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र माघार घेण्यात येणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रियेत होणारा सार्वजनिक उपद्गव टाळण्याची गरज असल्याने हातकणंगले तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१२, हातकणंगले समीर शिंगटे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या कालावधीत दि. १८ जानेवारी २०१२ ते ३० जानेवारी २०१२ पर्यंत तहसिलदार कार्यालय हातकणंगले परिसरात शंभर मीटरच्या परिक्षेत्रात (पूर्वस इंगवले हायस्कूल, पश्चिमेकडील भिंत, दक्षिणेस एमएससीबी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, पश्चिमेस गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांचे कार्यालय व उत्तरेस सांगली-कोल्हापूर रस्ता) खाली नमूद केलेले निर्बंध लागू केले आहेत.
      सदर कालावधीत उमेदवार अगर त्यांचेशी संबंधित व्यक्ती यांना १०० मीटरचे परिक्षेत्रात वाहन आणता येणार नाही. तहसिलदार कक्षामध्ये उमेदवारासह व फोटोग्राफरसह ५ पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. तहसिलदार कक्षामध्ये मोबाईल फोनचा वापर करता येणार नाही. सदर कालावधीत पोलीस परेड ग्राऊंड वगळता अन्यत्र कोठेही दुचाकी अगर चारचाकी वाहनांचे पार्किंग करता येणार नाही. सदरचा आदेश दि. १६ जानेवारी २०१२ रोजी लागू करण्यात आला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.