इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

शास्त्रीय संगीत उच्च अभिव्यक्तीचं प्रतीक - गानसरस्वती किशोरी आमोणकर

        कोल्हापूर दि. २१ : शास्त्रीय संगीत उच्च भाव आणि अभिव्यक्तीच प्रतीक आहे, असे प्रतिपादन गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी आज येथे केले.
      कोल्हापूर जिल्हा प्रशासन, गायन समाज देवल क्लब, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आज त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, दिग्दर्शक-अभिनेते अमोल पालेकर, संध्या गोखले, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, दिग्दर्शक चंद्गकांत जोशी, डॉ. सुनीलकुमार लवटे, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते.
      कोल्हापुरात आज झालेला हा सत्कार माझ्या माहेरचा सत्कार आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, करवीरवासियांनी माझ्यावर दाखवलेल्या या प्रेमाची कशी परतफेड करु हे मला समजत नाही.  कोल्हापुरात संगीत वाढतच राहील. कोल्हापूर अधिक समृध्द होत राहील, असा मला विश्वास आहे.
      त्या म्हणाल्या, एखाद्या विषयाची साधना करणार्‍या साधकाची भूमिका वर्धनशील असायला हवी. स्वतःला विसरल्याशिवाय अमूर्ताची सिध्दी होणे शक्य नाही. आत्म्याचा शोध घेणं कठीण कार्य आहे. शास्त्रीय संगीतात उच्च भाव प्रगट होतात, ज्या संगीतात स्वराचं सुप्रधान दर्शन होते ते शास्त्रीय संगीत होय. मानवाला ज्यावेळी शांततेची अनुभूती घ्यावी असे वाटते त्यावेळी तो शास्त्रीय संगीताकडे वळतो.
      जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या गौरवशाली कारकीर्दीचा आढावा घेतला. यावेळी गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे श्रीकांत डिग्रजकर यांनी वाचन केले. नीना मेस्त्री-नाईक यांनी सूत्रसंचलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.