रविवार, १५ जानेवारी, २०१२

कोल्हापुरात आणखी काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक - गृह राज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर दि. १५ : कोल्हापूर शहरातील वाहतूक नियोजन व्हावे यासाठी आणखी काही रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करण्याचा विचार असल्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा आज समारोप झाला. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
व्यासपीठावर महापौर कादंबरी कवाळे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, वाहनांची संख्या वाढत आहे. पण रस्ते वाढत नाहीत. त्यामुळे रस्ते आणि वाहतूक सुरक्षेला महत्व आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबरच अपघातांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने जाणीव जागृती व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येतो. पण रस्ता सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियम केवळ या पंधरवड्यात पाळून उपयोग नाही तर ते वर्षभर आपण सर्वांनीच पाळावे लागतील.
तरुणांनो गाडी वेगात चालवू नका, असे आवाहन करुन श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर बदलत चालले आहे. येथील रस्त्यांची गुणवत्ता आता सुधारली आहे. पण त्याचबरोबर वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी आणखी काही रस्त्यावर एकेरी वाहतुक करण्याचा विचार आहे. शहरात काही ठिकाणी वाहतुकीचे नियम सांगणारे डिजीटल बोर्ड लावावेत तसेच रिक्षा थांब्याचे नियोजन करावे अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाला केल्या.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही झाले. घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या प्राची नयन प्रसादे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध संघटनांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.