इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

एसएसबी प्रशिक्षण वर्गासाठी कोल्हापुरात १० फेब्रुवारीला मुलाखत

कोल्हापूर दि. ३० : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलातील तज्ञ अधिकार्‍यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एन्ट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणार्‍या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक/युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना एसएसबी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्ग, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड येथे प्रत्येकी १० दिवसांचे दोन प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी १५ फेब्रुवारी २०१२ ते २४ फेब्रुवारी २०१२, आणि १३ मार्च २०१२ ते २२ मार्च २०१२ असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून भोजनासाठी प्रती दिवस रु १९ प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.
          इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दि. १० फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी १० वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. २६६५८१२) येथे पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे. एसएसबी प्रवेश वर्गासाठी पुढीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. एसएसबी मुलाखतीचे पत्र प्राप्त झाले असल्यास किंवा सीडीएस लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा स्पेशल एंट्रीव्दारे एसएसबीकरिता अर्ज पाठविलेबाबतचा पुरावा आणावा. एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडधारक, एनडीएमधील परीक्षा उत्तीर्ण असल्याचा पुरावा आणावा. सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी रोजगार समाचार पत्रानुसार टेक्निकल/मेडिकल किंवा इतर अधिकारी पदासाठी अर्ज केले असल्यास अर्जाची छायांकित प्रत सोबत आणावी. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.