मंगळवार, १० जानेवारी, २०१२

गडहिंग्लज तालुक्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू

        कोल्हापूर दि. १० : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूका २०१२ जाहीर केल्या आहेत. निवडणुका निर्भय व शांततामय वातावरणात होणे आवश्यक असून निवडणूक प्रक्रियेत होणारा सार्वजनिक उपद्गव टाळण्याची गरज असल्याने गडहिंग्लजचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी संजय पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन सार्वत्रिक निवडणूक सन २०१२ चे कालावधीत गडहिंग्लज तालुका हद्दीमध्ये पुढील आदेश जारी केले आहेत.
        गडहिंग्लज तालुक्यात कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारची मिरवणूक संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकार्‍यांच्या किंवा पोलीस अधीक्षकांच्या पूर्व परवानगी घेतल्याशिवाय घेता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस लाऊड स्पिकरचा वापर संबंधित पोलीस अधिकार्‍यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करता येणार नाही. फिरत्या वाहनात लाऊड स्पिकर लावता येणार नाही. निवडणुकाबाबत ध्वनिक्षेपकाचा वापर सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्रौ १० वाजल्यानंतर करता येणार नाही. शस्त्र अधिनियम १९५९ खालील धारण केलेल्या कोणत्याही परवाना धारकांना गडहिंग्लज तालुका हद्दीमध्ये आपली हत्यारे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेण्याच्या तसेच अंगावर बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचार्‍यांना (पोलीस अधिकारी व कर्मचारी ) यांना लागू राहणार नाही. तसेच ज्या परवानाधारकांना रुढीप्रमाणे बंदूक प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे त्यांना हा आदेश लागू राहणार नाही. जिल्हा परिषद निवडणुकीच्या कालावधीत मोटार गाड्या वाहने ही कोणत्याही परिस्थितीत तीन पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यात चालविण्यात येऊ नयेत. मात्र सदर आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाड्याच्या ताफ्यास तो केंद्ग किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीस घेवून जात असल्यास तेंव्हा त्यांचे सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशांच्या अधिन राहून अंमलात येईल. तसेच सदर आदेश शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भास लागू असणार नाही.
        जिल्हा परिषद निवडणुकीचे कालावधीत सर्व शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाच्या आवारात किंवा शासकीय विश्रामगृहात व त्यांच्या आवारात किंवा जेथे शासकीय निधी गुंतवलेला आहे अशा कोणत्याही धर्मादाय संस्थेच्या आवारात, विश्रामगृहात किंवा इतर अशा कोणत्याही संस्थेच्या आवारात खालील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
         कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढणे किंवा सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे अथवा निवडणुकविषयक वाद्य वाजविणे, गाणी म्हणणे, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी सभा घेणे,  कोणत्याही प्रकारचा निवडणुक प्रचार करणे, कोणत्याही प्रकारच्या दुचाकी, चारचाकी वाहनावर कायदेशीर परवानगीविना झेंडा, पोस्टर्स, स्टिकर्स, कापडी फलक, डिजीटल बोर्ड, कटआऊट्‌स इत्यादि लावता येणार नाही. हा आदेश दि. ७ जानेवारी २०१२ रोजी सायं. ४ वाजल्यापासून ते दि. ८ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत लागू राहील, असेही गडहिंग्लजच्या कार्यकारी दंडाधिकार्‍यांनी या आदेशात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.