बुधवार, ४ जानेवारी, २०१२

एकनाथ पाटील यांचे सिंचनाच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे गौरवोद्‌गार

       कोल्हापूर दि. ४ : जलसिंचनातून आर्थिक विषमतेचे प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. जलसिंचनाच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक बदल घडविण्याचे कार्य श्री. एकनाथ पाटील यांनी केले आहे, असे गौरवोद्‌गार त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी आज येथे काढले.
      राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदी निवड झाल्याबद्दल गौरव समितीतर्फे एकनाथ पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
      राज्यपाल पाटील म्हणाले, अभियंते देशाचे खरे शिल्पकार आहेत. कारण विकासासाठी आवश्यक असणार्‍या सर्व पायाभूत सुविधा अभियंते उभ्या करतात. त्यामुळे अभियंते विकासदूत असतात. पंजाबसारखे राज्य आणि इस्त्रायलसारख्या देशात सिंचनाच्या सुविधा करण्यात आल्या, त्यामुळेच त्या देशांचा विकास झाला. श्री. एकनाथ पाटील यांनी सिंचनाच्या क्षेत्रात केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.
      सत्काराला उत्तर देताना श्री. पाटील यांनी आपल्या यशात शालेय जीवनातील शिक्षक, कुटुंबिय आणि जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, मला जलक्षेत्रातील सुधारणांची अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली. सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचीत क्षेत्रातील तफावत कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
      यावेळी श्रीमंत शाहू महाराज, महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे सदस्य आणि माजी सचिव व्ही. व्ही. गायकवाड, माजी सचिव नंदकुमार वडनेरे, अधीक्षक अभियंता खलील अन्सारी यांची भाषणे झाली. यावेळी जलवैभव या गौरवपर ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचलन केले. अण्णासाहेब माळी यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.