सोमवार, २ जानेवारी, २०१२

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी एकजुटीने काम करुया - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

         कोल्हापूर दि. २ : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करुया, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.
      कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारांचे आज वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी गृह, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी, उपाध्यक्ष धैर्यशील माने, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती युवराज पाटील, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती बाळासाहेब खाडे, समाजकल्याण समितीचे सभापती गोपाळ कांबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
      श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा अनेक अभियान व विकास योजना यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत देशात आघाडीवर असतो. ही आघाडी आपण यापुढेही कायम राखयला हवी. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी-कर्मचारी यांनी समन्वयाने काम करायला हवे. जिल्हा परिषद ही कार्यकर्ते घडविणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ती यापुढेही कार्यरत राहील.
      ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार अतिशय मोलाचा आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असणारे सदस्य व कर्मचारी यांना असा पुरस्कार देवून त्यांचे कौतुक करणे ही बाब आनंदाची आहे.
      नगरोत्थान योजनेप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्ते, गटर्स यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ग्रामोत्थान योजना राबविण्याचा राज्य शासनाचा विचार आहे अशी माहितीही सतेज पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी, उपाध्यक्ष धैर्यशील माने यांचीही भाषणे झाली.
      प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. डोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवि शिवदास आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेचे सदस्य - इकबाल बाबासाो बैरागदार (शिरोळ), इरफान खलीलुल्ला मणेर (करवीर), सौ. अर्चना अरुणकुमार जानवेकर (हातकणंगले), शशिकांत शामराव खोत (करवीर), बाबासाहेब विष्णु देवकर (करवीर). पुरस्कार प्राप्त कर्मचारी - संजय चिंतामणी अवघडे (अधीक्षक, ग्रामीण पाणी पुरवठा), उदय विलासराव भोसले (वरि. सहाय्यक, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्ग कसबा बावडा), सुनिल दिनकर मिसाळ (परिचर, समाजकल्याण विभाग), अर्जुन पांडुरंग यादव (वरि. सहा. (लेखा), वित्त विभाग), सुनिलकुमार बंडोपंत गायकवाड (शाखा अभियंता, पंचायत समिती, हातकणंगले), यशवंत खंडू जाधव (विस्तार अधिकारी, पंचायत समिती करवीर), श्रीमती रेखा सदाशिव घराळे (आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्ग, अब्दुललाट), अलताफहुसेन महंमद शेख (आरोग्य सेवक, मुख्यालय), गणपती गुंडू चव्हाण (आरोग्य सहाय्यक, मुख्यालय), राजन दत्तात्रय सुर्यवंशी (औषध निर्माण अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्ग, मुडशिंगी).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.