गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकार्यां्चे आवाहन

       कोल्हापूर दि. १९ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज केले.
      जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, उपजिल्हाधिकारी सुनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.
      बैठकीत जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी प्रचारासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाची मर्यादा काटेकोरपणे पाळावी. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करु नये.
      जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अतिशय पारदर्शी पध्दतीने घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे सांगून जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, मतदानासाठी येताना ओळखपत्र सोबत आणावे यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांत जागृती करावी.
      जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी निवडणुकीसाठीच्या पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त राहील यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस दल, अबकारी विभाग, वनक्षेत्रपाल यांचीही मदत घेतली जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.