शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

सेवाभावी संस्था, कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना अंगणवाडी, गाव दत्तक घेण्याचे आवाहन

          कोल्हापूर दि. २० : महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग तसेच राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्यावतीने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान १४ नोव्हेंबर ते ७ एप्रिल २०१२ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
         कुपोषणाची समस्या राज्यापुढील आव्हान असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना व आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही समस्या निर्मूलन करण्यात येत आहे. परंतु शाश्वत कुपोषणमुक्तीचा विचार करताना शासनाबरोबर समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग या कामी घेणे आवश्यक आहे. बालके भावी पिढी असून ती सुदृढ आणि निरोगी असेल तरच भविष्यात कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच राज्य सशक्त व सामर्थ्यशाली राज्य म्हणून स्थान कायम ठेवू शकेल. आपण कितीही पायाभूत प्रकल्प उभारले, भौतिक सुविधा निर्माण केल्या, मात्र भावी पिढी कुपोषित असेल तर प्रगतीची घोडदौड व्यर्थ असेल. यासाठी कुपोषणमुक्तीच्या या अभियानात जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, कंपन्या, स्वयंसेवी संस्थाबरोबरच इतरांनी सक्रिय सहभागी होऊन एखादी अंगणवाडी, एखादे गाव दत्तक घेतल्यास आपला गांव, तालुका व जिल्हा निश्चितपणे कुपोषणमुक्त करु शकू. शासनाच्या या उपक्रमात, अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.