बुधवार, ४ जानेवारी, २०१२

दलित मित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

        कोल्हापूर दि. ४ : सन २०११-१२ साठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देण्यात येणार असून इच्छुक सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांनी दि. २५ जानेवारी २०१२ पर्यंत दोन प्रतीमधील प्रस्ताव विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा, कोल्हापूर येथे सादर करावेत.
       अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती, शारीरिक आणि मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोगी तसेच भूमिहिन व दलित क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थपणे काम करणार्‍या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना व स्वयंसेवी संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय पुरुषांसाठी ५० वर्षापेक्षा कमी नसावे, स्त्रीचे वय ४० वर्षापेक्षा कमी नसावे. संबंधीत व्यक्ती आमदार, खासदार किंवा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नसावेत, समाजसेवेचा कालावधी कमीत कमी १५ वर्षे असणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत पासपोर्ट आकाराची दोन अलिकडील छायाचित्रे, तसेच पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्याकडील चालू वर्षाचा वर्तणूकीचा दाखला जोडावा. प्रस्तावासाठी लागणारे विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत विनामुल्य उपलब्ध होतील. इच्छुक व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्थांनी पुरस्काराबाबतचा प्रस्ताव दि. २५ जानेवारी २०१२ पर्यंत सादर करावा, असे आवाहन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.