इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २२ जानेवारी, २०१२

मुलांना सुसंस्कृत बनविल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. लोंढे

        कोल्हापूर दि. २२ : भाऊबंदकीतील वाद संपुष्टात येण्यासाठी पालकांनी मुलांना सुसंस्कृत बनविल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व्ही. आर. लोंढे यांनी आज आसळज येथे केले.
      गगनबावडा तालुका विधी सेवा समितीच्यावतीने आसळज गावांत श्री. लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली विधी साक्षरता शिबीर संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
      वडिलांच्या मालमत्तेत आता मुलींनाही समान हक्क असल्याने बर्‍याच ठिकाणी तंटे उद्‌भवतात. त्यासाठी मुलांना सुसंस्कृत बनविले पाहिजे. मुलगा सुसंस्कृत असेल तर बहिणीला योग्य मान देईल. त्यामुळे सुसंस्कृत मुलगी आपल्या भावाच्या वाटणीत हिस्सा मागणार नाही असे सांगून श्री. लोंढे म्हणाले ईर्र्षा व कटुता सामंजस्याने एकत्र बसून सोडविली पाहिजे. त्यासाठी न्यायालयात खटले दाखल करण्यापेक्षा ते तालुका व जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात येणार्‍या लोक अदालतमध्ये  आपआपसात तडजोड करुन सोडविले जातात. याचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांनी घेतला पाहिजे. यासाठी कायद्याचे मोफत मार्गदर्शनही करण्यात येत असून न्याय मिळण्यासाठी होणारा खर्च, वेळेची बचत होऊन कुटुंब एकसंघ राहण्यास मदत होईल. 
      बाल हक्क संरक्षण कायद्याविषयी न्या. एस. एम. पाटील, मिळकतीसंबंधीच्या कायद्याबाबत न्या. डी. व्ही. कुटे, महिला हक्क संरक्षणविषयी असणार्‍या कायद्याबाबत न्या. सौ. एम. एस. सहस्त्रबुध्दे तसेच कामगार कायद्याविषयी अ‍ॅड. बी. बी. कुरणे यांनी ग्रामस्थांना सोदाहरण माहिती देवून मार्गदर्शन केले.
      ग्रामीण भागातील कायद्यापासून वंचित राहिलेल्या पिडीत नागरिकांचे कायद्याविषयीचे अज्ञान दूर व्हावे, त्यांना  कायद्यांची सविस्तर माहिती व्हावी यासाठी ग्रामीण भागात कायदेविषयक शिबीर भरविली जात आहेत, असे प्रास्ताविकात सांगून मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे म्हणाले, ग्रामस्थांनी आपले तंटे लवकरात लवकर मिटावेत यासाठी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा. त्यामुळे खर्च वाचतो शिवाय कोर्ट फीही परत मिळते. याशिवाय गरिबांना न्याय मिळण्यासाठी आर्थिक सहाय्यही दिले जाते.
      विधी साक्षरता शिबीरास नायब तहसिलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत वसेकर, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत ग्रामसेवक एस. ए. भोसले यांनी तर आभार मानसिंग पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.