मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

धान उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ मिळविण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी

 


 कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना चार ठिकाणी भात विक्री नोंदणी करण्याकरिता व धान उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ मिळविण्यासाठी केंद्रावर दि. 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीकरिता शेतकऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयाशी अथवा श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय गडहिंग्लज, कोल्हापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे.

राज्य शासनाचे आधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता दि.महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीची कामे पाहते. हंगाम 2021-22 करीता शासनाने एफ.ए. क्यू प्रतीच्या धान (भात) करीता 1 हजार 960 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्या शेतकऱ्यांकरीता विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यांत चार ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरु केली असून 1) चंदगड तालुका खरेदी विक्री संघ लि, मार्फत, तुर्केवाडी, 2) चंदगड तालुका सहकारी कृषीमाल फलोत्पादन संघ लि, अडकूर, 3) आजरा किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, 4) राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या-सरवडे, येथे नोंदणी केंद्रे सुरु केली आहेत.

धान खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. नोंदणीकरीता शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगाम 2021-22 मधील धान (भात) पिक लागवडीची नोंद असलेल्या डिजिटल स्वाक्षरीचा मूळ सातबारा उतारा, आताचा मूळ सातबारा प्रत, आधारकार्ड व बॅक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे घेवून शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर नोंदणी करणे गरजेचे असून, नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस.व्दारे नोंदणी क्रमांक दिला जातो.

भविष्यात शासनाकडून धान (भात) खरेदीच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस.एम.एस.व्दारे खरेदीकरीता बोलविण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी तपासून शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष धानाची खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येईल, असेही श्री. खाडे यांनी कळविले आहे.

 

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.