इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

बालगृहातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कार्यशाळा

 


   कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): महिला व बाल कल्याण विभागांतर्गत राज्यात मुला-मुलींच्या नोंदणीकृत निवासी संस्था कार्यरत आहेत. तसेच बालगृह, शिशुगृह, खुले निवारा गृह व विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी निरिक्षण गृह आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालगृह, शिशुगृह, खुले निवारा गृह व निरिक्षण गृहातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डायटमार्फत मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत बालकांचा शैक्षणिक गुणवत्ता स्तर तपासणे, समुपदेशकांची मदत घेणे, जीवन कौशल्य आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. बालकाची भावनिक गरज भागवण्यासाठी त्यांची आई होऊन काम करा, हे उदात्त व पवित्र असे काम आहे, ही मुले राष्ट्राची संपत्ती आहेत, आपण सर्वजण मिळून बाल रक्षक होऊन व्रतस्थ दृष्टीने काम करूया, असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.आय. सी. शेख यांनी व्यक्त केले. बालगृहातील सर्वच मुलांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येईल. पहिली ते आठवीच्या मुलांना भाषा व गणित या विषयाची अध्ययन स्तर तपासणी, शिष्यवृत्ती, दीक्षा ॲप याबाबत मार्गदर्शन करायचे आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

या मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी कटिबद्ध राहुया, असे मत डाएटच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता व समता विभागप्रमुख डॉ. अंजली रसाळ यांनी केले. निशा काजवे यांनी अध्ययन स्तर निश्चितीबाबत मार्गदर्शन केले. समुपदेशक सरला पाटील यांनी संकुलातील विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज व महत्त्व किती गरजेचे आहे याबाबत संवाद साधला. शुभांगी मेथे- पाटील यांनी दीक्षा ॲप बाबत माहिती दिली.

कार्यशाळेस बालसंकुलातील सर्व अधिकारी,कर्मचारी, बालरक्षक उपस्थित होते. यावेळी  उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी बाल संकुलातील अधीक्षक राजू बिद्रेवाडी व पी. के. डवरी यांनी मनोगते व्यक्त केली.

          संकुलातील प्रशासकीय अधिकारी सारीका पठारे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

0000000

 

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.