मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया पर्यटन क्षेत्रातील तज्ञांचे वेबिनार द्वारे आवाहन

 


 




          कोल्हापूर, दि.28 (जिमाका): पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला नवी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असा निश्चय पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.

         छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन व रिसर्च (सायबर) येथे जागतिक पर्यटन दिन सप्ताहानिमित्त पर्यटन संचालनालय, जिल्हा प्रशासन, सायबर महाविद्यालय व कारवा हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन सप्ताहाच्या माध्यमातून 'पर्यटन विकास व जागरूकता 'या विषयावर वेबिनार घेण्यात आला.  वेबिनारच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी .एस. पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आली. जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते या वेबिनारचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

 जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, लोकसहभागातून शाश्वत आणि सर्वसमावेशक पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करुया. पर्यटन हा आर्थिक चक्राचा महत्त्वाचा कणा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी संस्था, व्यक्ती, समूह एकत्र येऊन पर्यटनाला नवी चालना देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

      राकेश माथुर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मिती मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. क्रीडा पर्यटन, मेडिकल पर्यटन, हेरिटेज पर्यटन याबरोबरच अध्यात्मिक पर्यटन क्षेत्रामध्ये मोठी संधी निर्माण झाली आहे. याचबरोबर पर्यटन क्षेत्राचा विकास करताना संबंधित भागातील स्थानिक लोकांचा सहभागही अत्यंत महत्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी चंद्रशेखर भडसावळे यांनी 'कृषी पर्यटन क्षेत्रातील संधी' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी व्हिएतनाम, सिंगापूर ची प्रगती पर्यटन क्षेत्रामुळे कशी झाली याचा दाखला दिला. सर्वांनी पर्यटन संस्कृती स्वतःपासून विकसित करणे ही काळाची गरज आहे. हे सांगताना 'सगुना बाग' चा संदर्भ त्यांनी दिला.

         पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर म्हणाल्या,  राज्य शासनाच्या वतीने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. पर्यटन विकासासाठी समाज, संस्कृती, पर्यावरण व अर्थव्यवस्था या चार बाबींची आवश्यकता असून या दृष्टीने  शाश्वत पर्यटन विकासावर भर दिला जात आहे. कृषी पर्यटन, कॅरॅव्हॅन, साहसी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन विकास साधला जात असल्याचे सांगितले.

           

 

 

 वीणा ट्रॅव्हल्सचे संस्थापक संचालक सुधीर पाटील म्हणाले, टूर ऑपरेटर्स व प्रतिनिधी यांची भूमिका पर्यटन विकासामध्ये महत्वाची आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी इथल्या निसर्ग संपदेची व प्रत्येक चांगल्या बाबीची माहिती जगापुढं मांडणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पर्यटन विकासामध्ये टूर ऑपरेटर्सना येणाऱ्या अडचणी ची माहिती त्यांनी दिली. 

डॉ. पी. एस .पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या पर्यटन सप्ताहाचे कौतुक केले. पर्यटन विकासासाठी 'टीम वर्क' महत्वाचे आहे, असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटन स्थळे विकसित करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची सखोल माहिती, याठिकाणी मिळणाऱ्या सुविधांबाबतची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्याची गरज आहे. यासाठी प्रयत्न व्हावेत,  जेणेकरून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी मिळेल.

डॉ. अमित माने यांनी कोल्हापुरमध्ये  भविष्यात मेडिकल हब होण्याची क्षमता असून यादृष्टीनं योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले.

           प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. सी .एस. दळवी यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी कोविड महामारीचा पर्यटन क्षेत्रावर झालेला परिणाम व कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वाढविण्यासाठी आपले वेगवेगळ्या क्षेत्रातील धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळी सुविधा, विकास, पर्यटन मार्केटिंग व सेवा या विषयावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याबरोबरच परिपूर्ण नियोजन, पर्यटकांसाठी योग्य मार्केटिंग संकल्पना व व्यवसायातील वेगवेगळ्या घटकांचा समावेश  यामध्ये समन्वयाची गरज असल्याचे सांगितले.

आभार कारवा हॉलिडेज चे संस्थापक संचालक वसीम सरकवास यांनी मानले.

या वेबिनार मध्ये कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात पुढं नेण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांनी महत्वपूर्ण विचार मांडले.

 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.