मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

अन्न व्यावसायिकांना विनापरवाना व्यवसाय न करण्याचे आवाहन


          कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : विनापरवाना विक्रेत्यांवर आणि विनापरवाना विक्रेत्यांना अन्न पदार्थ पुरवठा करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि घाऊक व्यापारी यांना परवाना/नोंदणी घेण्याकरिता उद्युक्त  करण्याच्या उद्देशाने आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यामध्ये प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. मोहिमेमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यांमध्ये विनापरवाना अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेण्यात येणार आहे. अन्न व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्री. केंबळकर यांनी केले आहे.

            संपूर्ण देशामध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ ची अंमलबजावणी सुरु होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. कायद्याचे कलम ३१ नुसार सर्व प्रकारच्या अन्न व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना अथवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे. तरीदेखील बहुतांश अन्न व्यावसायिक हे विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे वारंवार आढळून आले आहे.

विनापरवाना व्यावसायिकांना उत्पादक, वितरक आणि घाऊक व्यापारी यांनी अन्न पदार्थ वितरित करु नये. सर्व अन्न व्यावसायिकांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.

 

वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा कमी असलेले अन्न व्यावसायिक-     फोटो , आधार कार्ड, व्यवसायाच्या जागेची कागदपत्रे (मालकाचे नाहरकत अथवा भाडेकरार, लाईट बिल/असेसमेंट पावती/उतारा) इ.     

वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त असलेले अन्न व्यावसायिक- आधार कार्ड, व्यवसायाच्या जागेची कागदपत्रे (मालकाचे नाहरकत अथवा भाडेकरार, लाईट बिल/असेसमेंट पावती/उतारा), पाणी चाचणी अहवाल (उत्पादक/हॉटेल व्यावसायिकांसाठी, उत्पादकांसाठी जागेचा नकाशा, मशिनरीची यादी, तांत्रिक व्यक्तिबाबत माहिती, उत्पादनगृहाचे फोटो, अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली बाबत माहिती, रिकॉल प्लॅन, इ.

अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या कोल्हापूर कार्यालय ०२३१२६४१०९१ वर संपर्क साधावा. दि. १ ऑक्टोबर २०२१ पासून सर्व अन्न व्यावसायिकांना त्यांचेकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विक्री बिलांवर त्यांना मंजूर परवाना/नोंदणीवरील परवाना/नोंदणी क्रमांक टाकूनच बिल देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, याची देखील सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असेही अन्न व औषध प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

000000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.