मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

जिल्ह्यास लाभलेला पर्यटन स्थळांचा ठेवा जागतिक पर्यटकांना आकर्षित करेल अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने

 






 

कोल्हापूर, दि.28 (जिमाका): जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठीच प्रशासनामार्फत पर्यटन सप्ताह साजरा केला जात आहे. जिल्ह्यास लाभलेला हा पर्यटन स्थळांचा ठेवा जागतिक पर्यटकांना आपल्याकडे नक्कीच आकर्षित करेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी व्यक्त केला.

जागतिक पर्यटन दिन व सप्ताह निमित जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहे.  या निमित्ताने आज शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड व खिद्रापूर येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, तहसीलदार अपर्णा मोरे, गट विकास अधिकारी शंकर कवितके, कुरुंदवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, हेरिटेज कमिटीच्या संचालिका वैशाली नायकवडे यांच्यासह परिसरातील मान्यवर सहभागी झाले होते. कुरुंदवाड येथील हेरिटेज वॉकमध्ये नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी सहभाग घेतला.

श्री. माने म्हणाले, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर वास्तूकलेचा अप्रतिम नमुना आहे. हे मंदिर पहाताना  पुन्हा पुन्हा या ठिकाणी भेट देवून या वस्तूची माहिती घ्यावी अशी मनाला भुरळ पडते. शिल्पकलेचा हा अनमोल ठेवा जागतिक पर्यटकांपर्यंत पोहचाला पाहिजे, यासाठी प्रशासनामार्फत पर्यटन सप्ताह साजरा केला जात आहे. शशांक चोथे यांनी कोपेश्वर मंदिरातील शिल्पांची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे कोपेश्वर मंदिराला पुन्हा भेट देण्याचा मोह  उपस्थितीतांमध्ये निर्माण झाला असेल, असे ते म्हणाले.

हेरिटेज कमिटीच्या सदस्य वैशाली नायकवडे म्हणाल्या, खिद्रापूर येथे आम्हाला नवीन अनुभव मिळाला. आपल्या जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे विशेषत: कोपेश्वर मंदिर हे कलेचे ठिकाण आहे. मंदिरातील प्रत्येक शिल्पाचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिराची माहिती देताना अभ्यासक शशांक चोथे म्हणाले, कोपेश्वर-धोपेश्वराची एकत्रित स्थापना असणारे हे मंदिर आहे. यावेळी त्यांनी  मंदिराच्या दगडावर महाभारत, रामायणातील देव-दैवतांचा,भेटीचा-प्रतिज्ञेचा प्रसंग,पुराणातील  बळीराजा वामन यांच्या कथेचा कोरलेला प्रसंग उपस्थिताना  दाखवून मंदिरातील स्वर्गमंडपाचे छत आकाशाच्या दिशेने खुले गवाक्ष असून वैशिष्ट्यपूर्ण स्वर्ग मंडप कसे दिसते याची माहिती दिली. यावेळी खिद्रापूरचे सरपंच हैदरखान मोकाशी, राजापुरचे सरपंच संजय पाटील, खिद्रापूरच्या पोलीस पाटील दीपाली पाटील आदी उपस्थित होते.

कुरुंदवाड येथील ऐतिहासिक वारसा वास्तूंच्या पाहणीमध्ये कुरुंदवाड येथील गणेश मंदिर, विष्णू मंदिर, दत्त मंदिर, रावसाहेब पाटील वाडा, दौलतशहा वली दर्गा, नगरपालिका इमारत, भालचंद्र थिएटर, कृष्णा घाट या स्थळांना भेटी देण्यात आल्या. या  ऐतिहासिक वास्तूंची  माहिती इतिहास अभ्यासक शशिकांत पाटील, शशांक चोथे यांनी दिली. यावेळी कुरुंदवाडचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक उदय डांगे, प्रा.डॉ.सुनील चव्हाण उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.