मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

राज्याअंतर्गत विविध पिकस्पर्धांचे आयोजन


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : शेतक-यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, जिल्हा विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय कृषि सह संचालकांनी दिली आहे.

रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या पिकांचा स्त्री हंगाम पीकस्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे संबंधित पिकाखालील किमान १० आर. (०.१० हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे.

पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला असून ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र 1 हजार हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरीता पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतक-यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरीता भाग घेण्यासाठी ३०० रु. प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षीसे जाहीर केली जाणार आहेत.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर  सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते, आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असून त्यासाठी एकदाच ३०० रु.प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे, असेही कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.