रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

करवीर निवासीनीच्या सेवेतील घराण्यांचा सन्मान

 





कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : तत्कालीन विजयादशमी (दसरा) दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर 1715 रोजी करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मुर्तीची पुनर्प्राणप्रतिष्‍ठापणा झाली. आज या घटनेला 306 वर्षे पुर्ण झाली.             

या दिनाचे औचित्य साधून यशराज घोरपडे (गजेंद्र गडकर सरकार वंशज), निखिल प्रधान (सावगावकर प्रधान वंशज) आणि श्री पुजक प्रतिनिधी म्हणून माधव मुनीश्वर या करवीर निवासीनीच्या सेवेतील प्रमुख घराण्यांचा सत्कार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने आज करण्यात आला.

याबाबत थोडक्यात इतिहास असा - मोघलाईच्या काळात मूर्ती कपिल तिर्थाजवळ पुजाऱ्यांच्या घरी लपवून ठेवण्यात आली होती. ती करवीर छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आज्ञेवरून व नरहरभट सावगावकर यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे सिधोजी घोरपडे यांनी पुन्हा मंदिरात बसवली. आज या घटनेला तब्बल 306 वर्षे पूर्ण झाली आहेत.

मंदिराच्या सभागृहात छोटेखानी झालेल्या या सत्कार समारंभास चंद्रसेन जयसिंगराव खर्डेकर (सरकार), पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, सहसचिव शीतल इंगवले, सुयश पाटील, मिलींद घेवारी, धैर्यशील तिवले आदी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.