* कोल्हापूरातील वारसा स्थळांचे जतन व संवर्धनाबाबत सादरीकरण
* संवर्धनाबाबत सादरीकरण
* श्री अंबाबाई मंदिराच्या
इतिहासाबद्दल माहिती
* मराठा, मुघल राजवटीतील
शस्त्रात्रांचे प्रात्यक्षिक
* प्रात्यक्षिकातून कलांचे दर्शन
*
कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस व चंद्रकांत
कलासंग्रहालय व जिल्हा हेरिटेज
संवर्धन समितीच्या वतीने विविध उपक्रम
कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती
कार्यालय) : भारतीय
स्वातंत्र्याची ७५ वर्षे 'अमृतमहोत्सव' याबरोबरच २७ सप्टेंबर हा 'जागतिक पर्यटन
दिन' या दोन्ही समारंभाचे औचित्य साधून पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,
मुंबई अंतर्गत कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर व
चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय, कोल्हापूर ही तिन्ही संग्रहालये, तसेच कोल्हापूर
शहर व जिल्हा हेरिटेज संवर्धन समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक
पर्यटन दिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा सकाळी शुभारंभ करण्यात
आला. पहिल्या सत्रामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा इतिहास व
रचनेबाबतची विस्तृत माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून इतिहास अभ्यासक अँड श्री
प्रसन्न मालेकर यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांसमोर मांडली. तसेच
कोल्हापूर जिल्हा हेरिटेज समितीच्या अध्यक्षा वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी
कोल्हापूरातील विविध वारसा स्थळांची माहिती व त्यांचे कोल्हापूरातील हेरिटेज
स्ट्रिटवरील स्थान याबाबतचे विस्तृत विवेचन सादरीकरणाच्या माध्यमातून करून वारसा
स्थळांच्या जतन व संवर्धनाप्रती विदयार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी याबाबत प्रत्येक
भारतीय नागरीकांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
दुपारच्या
सत्रामध्ये इतिहास आभ्यासक शशांक चोथे यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी,
कुरूंदवाड तसेच खिद्रापूर या तीन शहरातील महत्वपूर्ण वारसास्थळांची वैशिष्टयपूर्ण
माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून देवून या वारसास्थळांचे विविध पैलू उपस्थितांसमोर
मांडले.
शस्त्रसंग्राहक
गिरीष जाधव यांनी मराठा, मुघल व इतर राजवटीतील विविध शस्त्रास्त्रांची माहिती
त्यांच्या प्रकार, शैलीसह ती शस्त्रे कशी चालवावीत याच्या प्रात्यक्षिकासह
महत्वपूर्ण व दुर्मिळ माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी व
मान्यवरासमोर मांडून अशा या दुर्मिळ ठेव्याचे दर्शन आपल्या शैलीदार वाणीतून
घडविले. यानंतर मुर्तीशास्त्रांचे आभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी बीड, आरे व
बहिरेश्वर येथील वारसा स्थळांची तसेच विरगळ या शिल्पप्रकाराची उद्बोधक माहिती
मांडली.
समारंभाच्या
शेवटच्या सत्रात प्राध्यापक व तज्ञ पर्यावरणशास्त्रज्ञ जय सामंत यांनी राधानगरीतील
नैसर्गिक वारसा त्याचे जतन व संवर्धन याबाबतची पर्यावरणविषयक शास्त्रोक्त माहिती
सादरीकरणाच्या माध्यमातून मांडली.
सकाळी ९.०० ते
सायं. ७.०० वाजेपर्यंत मातीची भांडी तयार करणे, कोल्हापूर चप्पल कारागिर, चांदीचे
कारागिर, सोन्याच्या दागिन्याचे कारागिरांनी प्रत्यक्ष वस्तु व दागिने तयार
करण्याची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांना वेगळीच अनुभूती दिली.
या उपक्रमामध्ये
पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र शासन, अंतर्गत सहायक संचालक
पुरातत्व विभाग, पुणे, सहायक अभिरक्षक कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, जिल्हाधिकारी,
कोल्हापूर हेरिटेज संवर्धन समिती
कोल्हापूर, हॉटेल मालक संघ व कोल्हापूर केटरिंग संघ यांचा महत्वपूर्ण व
उत्स्फूर्त सहभाग लाभला. या उपक्रमांचे नियोजन कोल्हापूर संग्रहालयाचे सहायक
अभिरक्षक उदय सुर्वे, लक्ष्मी विलास पॅलेसचे उप अवेक्षक उत्तम कांबळे, अमरजा
निंबाळकर व त्यांची संपूर्ण टिम याचबरोबर हॉटेल मालक संघाचे उज्वल नागेशकर, सचिन शानभाग व सर्व पदाधिकारी
यांनी केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.