सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक पर्यटन दिन सप्ताहास कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवात

 






 

कोल्हापूर, दि.26(जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज की जय! राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय! या जयघोषात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणारा प्रबोधनपर पोवाडा... पाटगाव सारख्या निसर्गरम्य वातावरणात रेखाटलेली उत्कृष्ट चित्रे व हुबेहुब दिसणारी शिल्प कलेची प्रात्यक्षिके.. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या रांगणा किल्ल्याची रोमांचकारी पदभ्रमंती, निसर्गसंपन्न राधानगरीतील नेचर ट्रेल, जैवविविधतेचे जागतिक वारसास्थळ असणाऱ्या दाजीपूर अभयारण्याची जंगल भ्रमंती आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन सप्ताहास पाटगाव येथून सुरुवात झाली.

 

पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधणार

- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

पर्यटनाला चालना देण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

'पर्यटक हे अतिथी' ही संकल्पना रुजायला हवी

पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे आमदार आबीटकर यांनी केले कौतुक

जगाला भुरळ पडणारी निसर्ग संपदा कोल्हापूर जिल्ह्यात असून लोकसहभागातून जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधणार, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त  पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित पर्यटन दिन सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते आज भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील मौनी महाराज मठ येथे चित्र व शिल्प कलेच्या प्रत्यक्षिकाने करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, मौनी महाराज पीठ पाटगाव ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बेनाडीकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक राजन गवस,पंचायत समिती सदस्य सरिता वरंडेकर, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, हिल रायडर्स चे प्रमोद पाटील, क्रेडाई चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, समीट ऍडव्हेंचर्सचे विनोद कांबोज, हेमंत शहा, सरपंच विलास देसाई, तहसीलदार अश्विनी वरुटे-अडसूळ, गट विकास अधिकारी सरिता पवार आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी शाहीर आझाद नायकवडी तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी दिव्यांग चित्रकार विजय टिपूगडे यांच्यासह सहभागी कलाकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या पाटगाव, भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सर्वांसमोर आणण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी प्रशासनाबरोबरच प्रत्येक व्यक्तीने मेहनत घेणं गरजेचं आहे. जिल्ह्यात येणारा 'पर्यटक हा आपल्या घरचा पाहुणा' समजून त्यांची काळजी घ्यायला हवी. आपल्याकडील प्रेरणादायी इतिहास, चांगल्या परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे, अभिमानास्पद संस्कृती, समृद्ध निसर्ग आदी बाबी जगासमोर आणणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रयत्नशील असून आपण सर्वजण मिळून यादृष्टीने प्रयत्न करुया आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 

प्रशासकीय कामातून वेळ काढून पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे आमदार आबीटकर यांनी कौतुक करुन ते म्हणाले, विपुल वृक्षसंपदेने नटलेला पाटगाव, कडगाव भाग खऱ्या अर्थाने ऑक्सिजन पार्क आहे.  पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून या भागाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. 

काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात भुदरगड तालुक्यातून  मुंबई-पुण्याकडे जाणारे येथील नागरिक आता याच भागात रोजगार निर्मिती करत आहेत. येथील उपलब्ध साधनसंपदेच्या बळावर महाबळेश्वर, माथेरान प्रमाणे भुदरगड तालुका उत्कृष्ट डेस्टिनेशन म्हणून उदयास येईल, असा विश्वास आमदार श्री. आबीटकर यांनी व्यक्त केला.

साहित्यिक राजन गवस म्हणाले, निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला वेगळा आनंद देतात. सुसंस्कृत बनवण्याचं काम निसर्ग करतो. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याजोगे चित्र-कला दालन पाटगाव परिसरात उभे रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.